कमर्शियल पायलट लायसन्स सेमिनारला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कमर्शियल पायलट लायसन्स सेमिनारला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : “सध्या विमानवाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची ही सुवर्णसंधी आहे. आज देशातील विमान उद्योग झपाट्याने प्रगती करत असून भारत त्यात अग्रेसर आहे. मात्र या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी तरुणांची संख्या कमी असल्याने भारताबाहेरील युवकांना रोजगारासाठी आमंत्रित करण्याची वेळ आली आहे, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळेच आजच्या काळात विमान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे,” असे प्रतिपादन यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक कॅप्टन नितीन बेंद्रे यांनी केले.

यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आणि बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “कमर्शियल पायलट लायसन्स” या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. हा सेमिनार पीएमसी मेट्रो स्टेशनजवळील एव्हिएशन अँड स्पेस गॅलरी येथे पार पडला.

या सेमिनारचे नेतृत्व कॅप्टन नितीन बेंद्रे यांनी केले. यावेळी यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीच्या संचालिका सौ. रश्मी इंदुलकर, कॅप्टन पुनीत वाखारिया, कॅप्टन अतुल वसकळे, कॅप्टन अकिन गोडेश्वर, कॅप्टन सिमरन, डॉ. सुलेखा सिंघानिया तसेच बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे व्यवस्थापक सुजित शेंडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना कॅप्टन बेंद्रे म्हणाले, “बारावीनंतर विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू शकतात. यासाठी भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय बंधनकारक आहेत. मात्र आगामी काळात कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठीही ही दारे खुली होणार आहेत. या क्षेत्रात प्रवेश करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. चष्मा असलेली व्यक्ती कॅप्टन होऊ शकत नाही, हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे. अशा अनेक गैरसमजुती दूर करून योग्य ते मार्गदर्शन यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीमार्फत सातत्याने दिले जाणार आहे.”