जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त हिंगोली’ अभियान राबविणार – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त हिंगोली’ अभियान राबविणार – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 02: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षांची शुचिता, पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राखण्यासाठी जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त हिंगोली’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
या अभियानांतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर कठोर दक्षता उपाययोजना राबविण्यात येणार असून भरारी पथके, स्थिर पथके, केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्यामार्फत प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. परीक्षा काळात कॉपीप्रकरणांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही निरीक्षण, कागदपत्रांची काटेकोर तपासणी तसेच गैरप्रकार आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता परीक्षा प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच केंद्रस्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. 


पालक, शिक्षक व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून ‘कॉपीमुक्त हिंगोली’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी माहिती देताना सांगितले की, इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून जिल्ह्यातील 54 परीक्षा केंद्रांवर 16 हजार 687 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यापैकी 4 परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून 39 परीक्षा केंद्रांवर 15 हजार 241 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 7 परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत. दहावीच्या 54 व बारावीच्या 39 अशा सर्व परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एक बैठे पथक नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
**