का सलतो आंबेडकर?- सामाजिक परिवर्तनाचा आवाज मांडणारी इंजि. हर्षवर्धन गायकवाड उमरजकर यांची प्रभावी कविता
विशेष कविता :
समाजातील विषमता, संघर्ष आणि परिवर्तनाचा प्रवास आपल्या प्रभावी शब्दांत मांडणारी "का सलतो आंबेडकर?" ही कविता...
कवी : इंजि. हर्षवर्धन गायकवाड उमरजकर B.Tech (Mech.)
इथल्या प्रस्थापितांच्या नाकावर टिचून
गोरगरिबांची लेकरं झाली डॉक्टर इंजिनीयर
म्हणून कदाचित सलतो आंबेडकर.
गावगाड्यात, खेड्यापाड्यात, वाडी तांड्यावर, फूटपाथ वर झोपणारी माणसं, आज मोठ्या बंगल्यात आली
म्हणून ही कित्येकांच्या डोळ्यात खुपतो आंबेडकर
चुलीतून निघणाऱ्या धुराने, समाजाने केलेल्या पडद्याने, घरात डांबून ठेवणाऱ्या परंपरेने,
जीव घुसमटून गेलेली स्त्री आज राष्ट्रपती झाली,
म्हणून इथल्या पुरुषार्थी समाजाला आज ही पचत नाही आंबेडकर.
कचरा वेचणारी, नाला साफ करणारी, ढोर फोडणारी, कातडी शिवनारी, हलगी वाजवणारी
आज संसदेत जाऊन थाटात बसली
म्हणून ही कित्येक जणांना सलतो आंबेडकर.
दुसऱ्यांच्या शेतात राबणारी, रोजाने मजुरी करणारी, दगड विटा फोडणारी,
आज शेकडो एकराची मालक झाली
म्हणून ही थोडा जड जातो आंबेडकर.
पाण्याच्या घोटासाठी तरसणारी,
अन्नाच्या कनासाठी दारोदारी भीक मागणारी,
आज बिसलेरी शिवाय पाणी सुद्धा पित नाहीत
म्हणून ही डोक्यात जात असेल आंबेडकर.
बैलगाडीला हात लावला म्हणून चाबकाचे कोडे खाणारे, भर उन्हात पायी चालत आपला संघर्ष लिहिणारे,
आज विमानाने थाटामाटात फिरतात
म्हणून कदाचित सलतो आंबेडकर.
ह्या व्यवस्थेने नाकारलेले, इथल्या समाजाने वाळीत टाकलेले, गळ्यात मडके बांधून फिरणारे, मागास म्हणून रोज रात्री रडणारे
आज संविधानात कलम १५ नुसार सगळे समान झाले
म्हणून ही ह्यांच्या डोळ्यात खुपतो आंबेडकर.
पण आंबेडकर औषध आहे इथल्या सामाजिक रोगावर. जातीच्या अमानुष विकृतीवर,
माणसाला माणूस करणारी लस म्हणजे आंबेडकर.
जगाच्या युद्धात बुद्ध शोधणे म्हणजे आंबेडकर,
समानतेचा शाहू पेरणे म्हणजे आंबेडकर,
शिक्षणाची दहाड देत फुले होणे म्हणजे आंबेडकर.
तो तुम्हाला सलेल, तुमचा डोळा फुटूजोपर्यंत खुपेल,
तुम्हाला पचणार नाही, इतका जड वाटेल,
पण संविधानाच्या प्रत्येक शब्दात तुम्हाला
आंबेडकर जिवंत होताना दिसेल.
आंबेडकर रोज जिवंत होताना दिसेल...
इथल्या कांबळ्यात, गायकवाडात, पाटलात, जोशीत, कुलकर्णीत, सगळ्यात आंबेडकर जिवंत होताना दिसेल...