सिनेस्टाईल पाठलागानंतर ‘एमडी’ ड्रग्जसह दोघे जेरबंद; चार दिवसांची पोलीस कोठडी
KS News सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे
सोलापूर (प्रतिनिधी) : शहरात ‘एमडी’ ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी मुंबई-पुणेमार्गे आलेल्या दोन तरुणांना जेलरोड पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करत अटक केली. न्यायालयाने दोघांना २६ एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुफियान फुलारी आणि तौफिक सय्यद अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत.
शहरातील काही तरुणांच्या मागणीनुसार मुंबई आणि पुण्यातून ‘एमडी’ ड्रग्ज आणून पुरवठा केला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जेलरोड पोलिसांनी सापळा रचत आरोपींना पकडण्याची योजना आखली. सुफियान आणि तौफिक हे चारचाकी वाहनातून सुमारे ४६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज घेऊन पुण्याहून सोलापूरकडे निघाले होते.बुधवारी सायंकाळी विजापूर वेशी परिसरात ग्राहकाच्या नावाखाली त्यांना बोलावण्यात आले. परिसरात संशयास्पद हालचाली जाणवताच आरोपींनी वाहन वळवून तुळजापूरच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जेलरोड पोलिसांची दोन पथके त्यांच्या मागावर होती.
तामलवाडी टोल नाक्याजवळ आरोपींची गाडी अचानक बंद पडल्याने त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून दोघांनाही पकडले. त्यांच्या ताब्यातून ४६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्जसह चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत.