राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भटक्या-विमुक्तांचा मेळावा; 122 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भटक्या-विमुक्तांचा मेळावा; 122 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मुंबई, विशेष प्रतिनिधी (सौ.रूपाली बैसाणे): सरोदे समाज उन्नती मंडळ, मुंबई, राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र आणि भटके विमुक्त जाती-जमाती विकास परिषद (अखिल भारतीय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 जून 2026 रोजी बोरिवली (पूर्व) येथील फुलपाखरू उद्यानातील शैलजा विजय गिरकर सभागृहात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भटक्या-विमुक्त समाजाचा मेळावा तसेच इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री. मंगेश शिंगे यांच्या प्रेरणादायी गीताने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पद्मश्री दादा इदाते (संस्थापक अध्यक्ष, भटके विमुक्त जाती-जमाती विकास परिषद – अखिल भारतीय) यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि सर्वसमावेशक प्रशासनाच्या कार्याचा आढावा घेत समाजातील दलित, वंचित आणि मागास घटकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह श्री. अनिल फड यांनी भटक्या-विमुक्त समाजासाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी समता परिषद मुंबईचे अध्यक्ष श्री. अशोक कांबळे, भाजपा भटके विमुक्त मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. बबनराव मोहिते, मुंबई अध्यक्ष श्री. चंद्रकांत शिंदे, श्रीमती रश्मी जाधव, श्रीमती सोनम नायर, श्री. अशोक वाडेकर, श्री. अरविंद गोसावी, श्री. ध्रुपद रवंदळे, श्रीमती अर्चना लष्कर, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री. विनोद गोसावी, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्री. सुदाम शिंदे, श्री. तानाजी शेगर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावीमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या 122 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे 9 विद्यार्थी होते. तर 97.20 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनीने सर्वाधिक गुणांची नोंद केली.

कार्यक्रमादरम्यान नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांबाबत शासनाकडे सविस्तर निवेदन सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. सहदेव रसाळ यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. संदेश भागवत, श्री. संदेश रसाळ, श्री. सुजित गोसावी आणि श्री. राहुल भुसारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री. गिरीधर साळुंके यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

ही माहिती भटके विमुक्त जाती-जमाती विकास परिषद (अखिल भारतीय), मुंबईचे कार्यवाह श्री. गिरीधर साळुंके यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली.