इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात महास्वच्छता अभियान उत्साहात

इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात महास्वच्छता अभियान उत्साहात

चारही प्रभाग समित्यांच्या कार्यक्षेत्रात पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांचा सहभाग

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने चारही प्रभाग समित्यांच्या कार्यक्षेत्रात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांच्या सहभागाने हे अभियान उत्साहात पार पडले.

या अभियानाचे नेतृत्व सहायक आयुक्त संतोष जिरगे, रोशनी गोडे, रामचंद्र कांबळे आणि नितीन बनगे यांनी केले. प्रभाग समिती अ अंतर्गत पंचगंगा नदी घाट, प्रभाग ब मध्ये किसान चौक, कलानगर, प्रभाग क मध्ये जयभीम झोपडपट्टी, वडर गल्ली, फकीर मळा तसेच प्रभाग ड अंतर्गत संपूर्ण शहापूर परिसरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, चौक, नाले, गटारी व परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली.

अभियानात कचरा संकलन, झाडाझुडपांची छाटणी, रस्त्यांच्या कडेला साचलेला गाळ व कचरा हटविणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

या महास्वच्छता अभियानात उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, अभिषेक वाळवेकर, नंदकुमार पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितले की, स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शहर कायम स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा.

महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित या महास्वच्छता अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरात स्वच्छतेचा सकारात्मक संदेश देण्यात यश आले.