स्वेरीच्या फार्मसी महाविद्यालयात ‘दंत रोग तपासणी शिबीर’ संपन्न

स्वेरीच्या फार्मसी महाविद्यालयात ‘दंत रोग तपासणी शिबीर’ संपन्न

पंढरपूर- ‘अहंकारवृत्ती आपल्या प्रगतीसाठी खूप हानिकारक असते. ही वृत्ती आज सगळीकडे  पहावयास मिळते आणि त्यामुळे होणारे नुकसान खूप मोठे असते म्हणून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने परिश्रम करत रहावे. आयुष्यात माहिती नसलेल्या गोष्टी जेंव्हा आपण शोधण्यास सुरुवात करतो तेंव्हा त्या शोधकार्यात एकाग्रता निर्माण होते. त्यासाठी आपण जे ऐकतो आणि विचार करतो, ते अंतर्मनात साठवून ठेवतो. अशा वेळी बाह्यमनात अनेक प्रश्न सुरु होतात. त्यावेळी मात्र आपण नकळत समोरच्याकडून येणाऱ्या प्रश्नांच्या प्रतिसादाकडे पाहतो कारण जे फायद्याचे आहे ते घेतले जाते. अशावेळी मन तृप्त असते. त्यामुळे सर्व चांगले दिसते, सकारात्मक विचार येतात. पण जेंव्हा मन दुःखी असते तेंव्हा मात्र मनात नकारात्मकता अकारण येते. अशावेळी मन पॉझिटिव्ह राहण्यासाठी सायन्सचा आधार घ्यावा लागतो.’ असे प्रतिपादन पुण्यातील दंतरोग तज्ञ डॉ.अमित नेमाणे यांनी केले. 
         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (डिग्री) व कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मसी महाविद्यालयात एक दिवसीय दंतरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अमित नेमाणे मार्गदर्शन करत होते. दिपप्रज्वलनानंतर पुढे बोलताना डॉ.अमित नेमाणे म्हणाले की, ‘अंतर्मन हे नेतृत्व ऐकते पण विचार करू शकत नाही म्हणून अंतर्मन व बाह्यमन हे जाणून घेण्यासाठी आपल्याला शांत व संयमाने समजून घ्यावे लागते. जे आवडते त्यात आपण मन भरून काम करू शकतो. त्यामुळे कोणतेही काम मनापासून केल्यास मोबदल्याबरोबरच आनंद देखील मिळतो. हा आनंद अवर्णनीय असतो. म्हणून ज्यामध्ये आवड आहे त्याचा पाठपुरावा करा. चांगले विचार केल्यास सकारात्मक क्रिया होण्यास मदत मिळते.’ असे सांगून त्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक विचार, ध्येय निश्चिती, नियोजन, स्पेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, मानसिक आरोग्याचे महत्व, मेडीटेशन, योग, पुरेपूर झोप, प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकणे, सतत शिकण्याची वृत्ती बाळगणे, अशा अनेक महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात डी. फार्मसी आणि बी. फार्मसी महाविद्यालयातील जवळपास १०० विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करण्यात आली. याशिबिरात विद्यार्थ्यांचे वेडेवाकडे दात, हिरड्यांचे आजार व दातांच्या समस्या, दोन दातामधील अंतर, दातांचे  विविध रोग, दाढ दुखी यांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत डॉ.अक्षय चौगुले व डॉ. मुकुंद पत्की आदी उपस्थित होते. सदरचे दंतरोग तपासणी शिबीर स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार व डी फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवे तसेच इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने दंतरोग तपासणी शिबीर संपन्न झाले. सूत्रसंचालन प्रा. एस.व्ही. कौलगी यांनी केले तर आभार प्रा. डी.व्ही.चव्हाण यांनी मानले.