ट्रॅफिकचे नियम न पाळणाऱ्यांवर मोठी कारवाई व दंड – नागरिकांमध्ये शिस्त निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न

ट्रॅफिकचे नियम न पाळणाऱ्यांवर मोठी कारवाई व दंड – नागरिकांमध्ये शिस्त निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न
माळेगाव, दि. ६ नोव्हेंबर —
माळेगाव शहरात वाढत्या वाहतूक कोंडी, अपघात आणि नियमभंगाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी माळेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत ट्रॅफिकचे नियम पाळण्यात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर दंड आकारला आहे.
 
प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मागील काही दिवसांपासून सुरू असून, शहरातील प्रमुख चौक, शाळा परिसर, तसेच मुख्य रस्त्यांवर वाहतूक तपासणी मोहिमा घेतल्या जात आहेत.
 
या कारवाईत हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, सीट बेल्ट न लावणारे चारचाकी चालक, परवाना किंवा वाहनाचे कागदपत्र नसणारे, तसेच सिग्नल तोडणारे आणि मोबाईलवर बोलत वाहन चालवणारे चालक या सर्वांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही अनेक जण नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आल्याने पोलिस प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत.
 
शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी तपासणी नाके उभारून वाहन तपासणी केली. यावेळी दंड आकारण्यासोबतच अनेक वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली.
 
पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे म्हणाले,
 
“वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हेल्मेट, सीट बेल्ट, वाहन कागदपत्रे यांचे पालन केले तर अपघात कमी होतील आणि जीव वाचतील. आमचे उद्दिष्ट दंड वसूल करणे नाही, तर लोकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण करणे आहे.”
 
माळेगाव पोलिसांनी पुढेही अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांनी सहकार्य करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
 
“नियम पाळा – सुरक्षित राहा, आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा!”
— माळेगाव पोलिस ठाणे