रंगानुभूति: नाट्य प्रयोगकला महोत्सव हा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव होऊ शकतो - सतीश आळेकर

पिंपरी पुणे (दि. २२ सप्टेंबर २०२५) - पिंपरी चिंचवडमध्ये या महोत्सवाने कला संस्कृती क्षेत्रासाठीचे अधिक पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, ग. दि. माडगूळकर, आचार्य अत्रे, कै. अंकुश लांडगे, निळू फुले सभागृह अशी उत्तम व्यवस्था असलेली नाट्यगृह महापालिकेच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत. येथे भरपूर सोयी उपलब्ध असून अनेक कलावंत रंगभूमीची सेवा करत आहेत. येथील वाढता प्रतिसाद बघता इथल्या समाजाची कलेची आवड पाहता केरळात दरवर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाप्रमाणेच महाराष्ट्रातील त्यात पिंपरी चिंचवड शहरात घेतला जाणारा हा रंगानुभूति: महोत्सव हा आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणून व्हावा. तर पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात देखील ललित कला केंद्राची स्थापना झाली पाहिजे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केले. 'रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोगकला महोत्सव २०२५' यामध्ये रविवारी एफटीआयआयचे माजी विभागप्रमुख प्रा. समर नखाते यांचा सतीश आळेकर यांच्या हस्ते 'रंगानभूति: सन्मान' हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरकुल) विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाऊंडेशनचे संस्थापक प्रभाकर पवार, महोत्सवाच्या समन्वयिका अमृता ओंबळे आदी उपस्थित होते. यावेळी राजस्थानमधून येवून या महोत्सवात 'माया' ही कावड कथा सादर करणारे कलावंत अक्षय गांधी यांचाही सत्कार करण्यात आला.
कलेमुळे माणुसकीची संवेदना व्यापक होते. कला ही माणसाला तोल सांभाळायला शिकवते. नाटक ही प्रयोगजीवी कला आहे. कलाकार आणि प्रेक्षक एकत्र आले; तर त्यातून नाट्यरंगाभिसरण सुरू राहते आणि कलावंत व प्रेक्षकांना रंगानुभूति:चा प्रत्यय येतो. रंगानुभूति: नाट्य महोत्सवात महाराष्ट्रसह देशाच्या अन्य प्रांतातील कलावंत सहभागी झाले असून त्यांची कला पाहण्याची संधी मिळाली आहे. यामुळे कलावंत आणि कलाविश्व अधिक समृद्ध होण्यास मदत होईल, असे प्रा. समर नखाते यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
या तीन दिवसांच्या महोत्सवात पैस करंडक अंतर्गत- नाट्यछटा, एकपात्री अभिनय,मूकनाट्य,लघुनाटिका सारख्या स्पर्धा तर महोत्सवात गायनासह विविध प्रांतातील नाट्य प्रयोगकला, लोककला, एकलनाट्य, आदी भरगच्च कार्यक्रम देशाच्या विविध भागांतून आलेल्या कलावंतांनी सादर केले. तर चित्रकला प्रदर्शन आणि पिंपरी-चिंचवड शहराचा सांस्कृतिक वारसा मांडणारं रंगदर्शन प्रदर्शनही प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली. एकमेकांशी संवाद साधता आला, असे प्रभाकर पवार म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद बावा तेजस्विनी गांधी कुलकर्णी यांनी केले. आभार अमृता ओंबळे यांनी मानले. कार्यक्रमास रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर महोत्सवाच्या उत्तररंगात सतीश आळेकर लिखित आणि सुव्रत जोशी आणि गिरीजा ओक यांची प्रमुख भूमिका असलेले 'ठकीशी संवाद' या नाटकाच्या सादरीकरणाने आणि त्यावरील विस्तृत चर्चेने या महोत्सवाची सांगता झाली. दरम्यान सकाळच्या सत्रात फिजिकल थिएटर कार्यशाळा, दुपारी हिंदी नाटक 'माया' हे कावड कथा या रचनेतून सादर करण्यात आले. त्यानंतर लेखिका व अभिनेत्री वंदना घांगुर्डे यांची श्रीकांत चौगुले यांनी प्रकट मुलाखत घेतली.
----