बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी थेरगावमध्ये तरूणाला अटक; खंडणीविरोधी पथकाची कारवाई...
पिंपरी :-बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. ४ नोव्हेंबर) दुपारी थेरगाव येथे करण्यात आली.
साहिल विश्वनाथ बारणे (२४, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह गुरुराज देवीदास फंड, श्लोक दीपक सोनार, महादेव चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार किरण जाधव यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव मधील जय मल्हारनगर येथे एक जण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून साहिल बारणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले आहे. साहिल याने पिस्तूल महादेव चव्हाण याच्या मध्यस्थीने गुरुराज आणि श्लोक या दोघांकडून खरेदी केले होते. उपनिरीक्षक बालाजी मेटे तपास करीत आहेत.