पुणे :-महाराष्ट्राच्या राजकारणात एका जमिनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सरकारी नियमांना पायदळी तुडवत जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामुळे महसूल विभागाकडून विशेष सवलत देण्यात आलीय का असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.
दोन दिवसांत सगळं कसं काम होतं – अंबादास दानवे
पार्थ पवारांकडून १८०० कोटींच्या जागेची ३०० कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या प्रकरणी दानवेंनी संताप व्यक्त केला आहे. तर स्टॅम्पड्युटी म्हणून केवळ ५०० रुपये भरल्याचेही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या हा अजितदादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, अशीही टीका अंबादास दानवे यांनी एक्स पोस्टमधून केली आहे. त्यामुळे आता जमिनीच्या व्यवहारावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. लोकांच्या अनेक वर्षे फाईल पुढे जात नाही, यांचा दोन दिवसांत सगळं कसं काम होतं, असा सवाल देखील अंबादास दानवेंनी उपस्थित केला आहे.
दोन दिवसात स्टॅम्प ड्युटीही माफ..
दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा कमाल झाली! २२ Hएप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!,” असंही अंबादास दानवे म्हणाले.