पनवेल महानगरपालिकेच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन

पनवेल महानगरपालिकेच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन

पनवेल ता. 29 : पनवेल महानगरपालिका आपला 9 वा वर्धापन दिन दिनांक 01 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होत असून आपल्या 10 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त मा. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी  आज दिनांक 29 रोजी करण्यात आले होते. यास उस्फुर्त प्रतिसाद कर्मचाऱ्यांकडून मिळाला.

या स्पर्धांचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या हस्ते नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी उपायुक्त स्वरूप खारगे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, क्रिडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख हरेश जाधव,जनसंपर्क अधिकारी नितीन साके, वर्षा कुलकर्णी, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, शिक्षकवृंद उपस्थित होते.

       रांगोळी स्पर्धा, काव्य वाचन (स्वरचित), मिमीक्री व अभिनय स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, महिलांसाठी विशेष उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा महिला इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. 

रोजच्या कामाच्या दगदगीतून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली. महानगरपालिकेच्या रोजच्या कामामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना याप्रकारे संधी उपलब्ध करून देऊन एक प्रकारे त्यांच्या कलेचा गौरव करण्यात आला.