याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १४.३० वाजेच्या सुमारास, फिर्यादी भानुदास मुकुंदराव बिरादार (वय ६० वर्षे), व्यवसायाने सेवानिवृत्त शिक्षक, रा. कोर्ट कॉलनी, पठाणवाडी, लातूर, यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, नमूद वेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या घरी येऊन त्यांना बाहेर बोलावले व त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची चेन खेचून चोरून नेली, तसेच तिसरा साथीदार रिक्षामधून तिथून पळून गेला.
फिर्यादीच्या या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी तीन इसमांविरुद्ध चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची गांभीर्याची दखल घेत पोलीस अधीक्षक लातूर यांच्या सूचनेवरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची तात्काळ स्थापना करण्यात आली. तपासादरम्यान बारकाईने टेक्निकल व गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती मिळवून मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले मात्र, फिर्यादीने सांगितलेल्या वेळेत आणि ठिकाणी कोणतीही चेन स्नॅचिंगची घटना आढळून आली नाही. इलेक्ट्रॉनिक पुरावे व इतर तांत्रिक पुरावे तपासले असता, गुन्हा घडल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही. स्थानिक गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा काही लोकांसोबत वैयक्तिक वाद असल्याचे समोर आले. त्या वादातील व्यक्तींना अडकवण्यासाठी त्यांनी जाणूनबुजून खोटी फिर्याद दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
तपासादरम्यान पोलीसांनी फिर्यादीकडून चौकशी केल्यावर सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. मात्र, तांत्रिक पुरावे समोर ठेवल्यानंतर त्यांनी शेवटी गुन्हा खोटा असल्याची कबुली दिली. तपासादरम्यान फिर्यादीकडून सदर सोन्याची चेन जप्त करून, पडताळणी केली असता ती फिर्यादीच्या मालकीचीच असल्याचे सिद्ध झाले.
यानंतर सदर चेन फिर्यादीच्या पत्नीस परत करण्यात आली आहे.
खोटी तक्रार देऊन पोलीस प्रशासनास दिशाभूल केल्याबद्दल फिर्यादी भानुदास मुकुंदराव बिरादार यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई मा. श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर; मा. श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर तसेच मा. श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, सहायक फौजदार भिमराव बेल्लाळे, पोलीस अंमलदार बळवंत भोसले, दामोदर मुळे, राजाभाऊ मस्के, विश्वंभर तुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.उ.नि. श्रीकांत मोरे हे करीत आहेत.
नागरिकांना आवाहन :
लातूर पोलीस नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो की —
खोटी तक्रार देणे हे गंभीर गुन्हा असून, अशा कृत्यामुळे शासकीय यंत्रणेचा वेळ आणि संसाधनांचा अपव्यय होतो. अशा प्रकारे खोटी फिर्याद देणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नागरिकांनी कोणतीही तक्रार देताना प्रामाणिक व वस्तुनिष्ठ माहितीच द्यावी जेणेकरून पोलीस तपास प्रभावीपणे करता येईल.
आपला ,
- करण भरत भोईर
भिवंडी तालुका प्रमुख
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
महाराष्ट्र राज्य