डुडुळगाव येथील खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश; पत्नीसह प्रियकराला अटक

डुडुळगाव येथील खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश; पत्नीसह प्रियकराला अटक

पिंपरी :-डुडुळगाव येथे चाकूने भोसकून झालेल्या ट्रकचालकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला पाच दिवसांत यश आले. प्रियकराबरोबर लग्न करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पत्नीने खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
आमुसाब साहेबलाल मुल्ला (वय ३४, रा. डुडुळगाव) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. त्यांची पत्नी जेबा आमुसाब मुल्ला (वय ३०) आणि तिचा प्रियकर अब्दुल मकबुल मलिक (वय ४५, रा. डुडुळगाव, मूळ – उत्तर प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आमुसाब यांचा डुडुळगाव येथील डोंगराजवळ पोटात चाकूने भोसकून खून झाल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. निर्जन भाग असल्याने पोलिसांना कोणताही पुरावा हाती लागला नाही. या गुन्ह्याचा तपास दिघी पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट तीन व गुंडा विरोधी पथक करीत होते.
पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिने इतरांची नावे सांगून, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आरोपीचा शोध घेत असताना आमुसाब यांच्या शेजारी राहणाऱ्या भंगार व्यवसायिकाकडे चौकशी करीत असताना त्यांच्यातील अब्दुल हा मूळ गावी गेला असल्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी अब्दुल याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आमुसाबची पत्नी जेबा हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. जेबासोबत लग्न करणार असल्याने तिच्या सांगण्यावरूनच आपण आमुसाब याचा खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
सदरची कारवाई ही गुंडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार त्रिनयन बाळसराफ, रामदास मेरगळ, यदु आढारी, संदिप सोनवणे, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, तसेच गुंडा विरोधी पथकाकडील अंमलदार गंगाराम चव्हाण, विजय गंभीर, ज्ञानेश्वर गिरी, गणेश मेदगे यांनी केली आहे.