केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे विश्वस्त, त्रावणकोर राजघराण्याचे युवराज आदित्य वर्मा यांनी घेतले 'दगडूशेठ' चे दर्शन

केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे विश्वस्त, त्रावणकोर राजघराण्याचे युवराज आदित्य वर्मा यांनी घेतले 'दगडूशेठ' चे दर्शन

पुणे : केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे विश्वस्त आणि त्रावणकोर राजघराण्याचे युवराज आदित्य वर्मा यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत महामंगल आरती केली. यावेळी त्यांनी श्रीं ना अभिषेक देखील केला. वेदमूर्ती नटराज शास्त्री यांनी अभिषेकाचे पौरोहित्य केले. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने युवराज आदित्य वर्मा यांचा यशोचित सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात आलेल्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर प्रतिकृतीचे भव्य छायाचित्र त्यांना देण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सिद्धार्थ गोडसे, अजय मोझर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टच्या सर्व उपक्रमांची माहितीही यावेळी त्यांनी घेतली

युवराज आदित्य वर्मा म्हणाले, महागणपती 'दगडूशेठ' ने स्वतःच मला येथे आमच्या कुटुंबासाठी, आमच्या लोकांसाठी आणि सर्वांसाठी आशीर्वाद घेण्यासाठी बोलावले आहे. जेव्हा मी येथे आलो, तेव्हा मला श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची 'दगडूशेठ' गणपतीच्या गणेशोत्सवात केलेली प्रतिकृती पाहायला मिळाली. मला खूप आश्चर्य वाटले आणि ती खूप नीटनेटकेपणाने तयार केलेली होती. या सुंदर उपक्रमासाठी मी मनापासून कौतुक व्यक्त करतो. ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि काम करणाऱ्या लोकांचे आभार मानतो आणि मी प्रार्थना करतो की, महागणपती विघ्नहर्ता सर्व लोकांचे रक्षण करो.

कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, यावर्षी श्री दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यावेळी गणेशोत्सवात आदित्य वर्मा यांना आमंत्रित केले होते, परंतु ते येऊ शकले नाहीत. आज, उत्सवानंतर, ते गणपती बाप्पाच्या मंदिरात आले, अभिषेक केला आणि महामंगल आरती केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपरिक ढोल ताशा आणि केरळी वाद्य चेंदा मेलमच्या सुरेल वाद्यवादनात त्यांचे स्वागत करण्यात आले. 

* फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने  केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे विश्वस्त आणि त्रावणकोर राजघराण्याचे युवराज आदित्य वर्मा यांचा यशोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी श्रीं ची आरती व अभिषेक देखील केला.