स्वेरीच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’मध्ये पालक मेळावा संपन्न

स्वेरीच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’मध्ये पालक मेळावा संपन्न

पंढरपूर- ‘धकाधकीच्या जीवनात सध्या माणूस हा माणुसकी विसरत चालला आहे. अशा परीस्थितीत पाल्याची प्रगती पाहता स्वेरीची शिक्षण पद्धत कौतुकास्पद आहे. पाल्याच्या विकासासाठी स्वेरीचे परिश्रम हे राज्यात अनुकरणीय आहेत कारण पालक मेळाव्यातून पाल्य, पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद होतो. त्यामुळे या संवादातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देता येतो. जर आमचा पाल्य भविष्यात शासकीय नोकरी करत नसेल तर त्याला उद्योगधंद्याकडे अथवा खाजगी कंपनीत नोकरीकडे वळवले पाहिजे यासाठी त्याची मानसिकता बनविण्याचे कार्य स्वेरी प्रामाणिक करते आहे. म्हणून आम्ही पालक वर्ग आमच्या पाल्यांच्या भविष्यासाठी ‘स्वेरी’ची निवड करतो. आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे स्वेरी हा एक ब्रँड झाला आहे.’ असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी अन्सार शेख यांनी केले.
         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या वतीने आयोजिलेल्या ‘पालक मेळाव्या’त पालक प्रतिनिधी म्हणून अन्सार शेख हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार ह्या होत्या. दिपप्रज्वलनानंतर विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद यांनी पालक मेळाव्याची रूपरेषा सांगितली. मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधता येतो. यातून पाल्याच्या प्रगतीला वेग येतो. यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते असे सांगितले. डॉ.नीता कुलकर्णी यांनी विभागाची संपूर्ण माहिती देवून विद्यार्थ्यांच्या जडण-घडणी मध्ये शिक्षक वृंद आणि पालकांची भूमिका महत्वाची कशी असते हे स्पष्ट केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे विभागप्रमुख प्रा. ए. ए. मोटे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर भविष्यात नोकरी, प्रशासकीय सेवा अथवा खाजगी कंपनीमध्ये काम करताना आपली वेशभूषा, संभाषण पद्धत, माहितीचे सादरीकरण या महत्वाच्या बाबी असून मार्क थोडेफार कमी पडले तर चालतील पण आपल्या विभागाची संपूर्ण माहिती अपडेट असावी व ती आत्मविश्वासपूर्ण सादर करणे आवश्यक आहे.’ असे सांगून करिअर साठी तयारी कशी करावी याबाबत माहिती दिली. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस.मठपती म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना विनाकारण घरी ठेवून घेवू नका. भावनिक होऊन निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे कॉलेज मध्ये नियमितच्या लेक्चरकडे कमी लक्ष लागेल. कालांतराने त्याचा परिणाम होवून विकासाच्या वाटेवर असलेल्या पाल्याला अधोगतीचा सामना करावा लागेल. यासाठी आपला पाल्य कॉलेजमध्ये नियमित कसा असेल ? त्याची प्रगती कशी आहे,  यासाठी अवघे चार वर्षे काळजी घ्या.’ असे आवाहन केले. महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. अर्चना कदम यांनी मुलींच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले तसेच मुलींच्या विकासासाठी स्वेरीच्या शिस्तीचे स्वागत केले. त्याचबरोबर ‘नाईट स्टडी’ च्या माध्यमातून त्यांचे करिअर घडण्यास मदत होत असल्याचे सांगितले. वसतिगृह व्यवस्थापक डॉ. के.बी. पाटील म्हणाले की, ‘अभियंता सर्वच ठिकाणी बनवले जाते परंतु या स्वेरीत अभियंत्याबरोबरच समाजात धीटपणे वावरण्यासाठी एक चांगला माणूस बनविला जातो, जी सध्या काळाची गरज आहे. त्याचबरोबर स्वेरी अंतर्गत असलेल्या मुलांसाठी तीन व मुलींसाठी तीन असे ६ स्वतंत्र असलेल्या वसतिगृहाची सध्याची स्थिती, मुलामुलींची संख्या, असलेल्या सुविधा आदी बाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.मिनाक्षी पवार म्हणाल्या की, ‘विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी पालकांची भूमिका महत्वाची असते. यामधून विचारांची देवाण घेवाण होत असताना पाल्यामधील कमतरता जाणवते आणि यातून पाल्याचा बौद्धिक विकास होतो. यासाठी पालक मेळाव्याला पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले जाते. एकूणच स्वतःच्या भावनिकतेला मुरड घालून विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे लक्ष देणे महत्वाचे वाटते. शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्याने विद्यार्थी यशाची शिखरे सहज गाठू शकतो म्हणून पालकांनी वेळोवेळी महाविद्यालयाला भेट देऊन, संबंधित शिक्षकांशी भेटून पाल्याच्या प्रगती बाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. यावेळी संजय जानराव, अमोल गवसणे, संतोष देशमुख, भजनदास शिंदे, यांच्यासह काही पालकांनी आपले प्रश्न उपस्थित केले असता उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील २०० पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ए.ए.गरड यांनी केले तर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एस.एस. गावडे यांनी आभार मानले.