स्वेरीला ‘टेक्नॉलॉजी अँड एआय एज्युकेशन रँकिंग्ज २०२५’ मानांकन प्राप्त

स्वेरीला ‘टेक्नॉलॉजी अँड एआय एज्युकेशन रँकिंग्ज २०२५’ मानांकन प्राप्त

पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) ला ‘क्रॉनिकल्स ऑफ इंडिया’च्या वतीने ‘टेक्नॉलॉजी अँड एआय एज्युकेशन रँकिंग्ज २०२५’ अंतर्गत ‘इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेटिव्ह लर्निंग’ म्हणून ‘ए-२’ श्रेणीमध्ये मानांकन मिळाले आहे. त्यामुळे स्वेरीचा सर्वत्र  गौरव होत आहे. विशेष म्हणजे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) ने २०२५ हे वर्ष 'कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष' (इअर ऑफ आर्टीफिशिअल इंटेलिजन्स) म्हणून घोषित केले आहे. 
         स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने या 'टेक्नॉलॉजी अँड एज्युकेशन रँकिंग्ज २०२५’ मध्ये सहभाग नोंदविला आणि ‘इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेटिव्ह लर्निंग’ हे मानांकन मिळाले. फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘क्रॉनिकल्स ऑफ इंडिया’ या संस्थेने देशभरातून वेगवेगळ्या संस्थांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार स्वेरीने यात सहभाग नोंदवला होता. स्वेरीने सादर केलेल्या  कागदपत्रांची व माहितीची छाननी, पूर्तता व खात्री करून मानांकनाचे निकाल फेब्रुवारीच्या उत्तरार्धात त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केले. या मानांकन पुरस्कारासाठी एआय मध्ये अनुभव असणाऱ्या प्राध्यापकांची संख्या, संशोधन प्रकाशने, विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट दर, अत्याधुनिक एआय सॉफ्टवेअर साधने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य, तसेच एआय संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांसारख्या निकषांचा विचार करून मूल्यमापन करण्यात आले. ही प्रतिष्ठित मान्यता तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आली आहे. संस्थेने नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान, अध्यापन-पद्धती आणि उद्योजकतेच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीस हातभार लावलेला आहे. या सन्मानाने स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक व व्यवस्थापकीय कार्यक्षमतेला एक नवी ओळख मिळाली असून, संस्थेच्या गुणवत्ता शिक्षणातील योगदानाची पावती मिळाली आहे. ही मान्यता स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सततच्या शैक्षणिक सुधारणा, विविध शैक्षणिक उपक्रम, तंत्रज्ञान-आधारित अध्यापन आणि नाविन्यपूर्ण संशोधन उपक्रमांसाठी नवी ऊर्जा देणारी ठरेल. भविष्यातही संस्था तंत्रज्ञान आणि एआय शिक्षणातील उत्कृष्टता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहील. या मानांकनासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे आणि उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली, इंटरनल क्वालिटी अशुरन्स सेल (आय.क्यू.ए.सी.) चे समन्वयक डॉ. संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली व प्राध्यापकांच्या सहकार्याने सहभाग नोंदविला. सदरच्या प्रस्तावामध्ये महाविद्यालयात असलेल्या तंत्रज्ञान आणि एआय शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रम, सोयी-सुविधा आणि तंत्रज्ञान-आधारित व्यवस्थापनाचा समावेश होता. स्वेरीकडून नेहमीच तंत्रज्ञान आणि एआय शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले जाते. एआयसीटीईने घोषित केलेल्या एआय वर्षाच्या अनुषंगाने, स्वेरीचे हे यश अधिक महत्त्वपूर्ण ठरते. या आणि अशा सर्व उपक्रमांचा एकंदरीत परिपाक म्हणजे स्वेरीला मिळालेला हा गौरव होय. या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी स्वेरीच्या 'आयक्यूएसी’ विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.