ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या शौर्याचा सन्मान

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या शौर्याचा सन्मान

ठाणे, दि. १३ : डकार २०२६ युथ ऑलिम्पिक गेम्समध्ये महिलांच्या १०० मीटर अडथळा दौड स्पर्धेत कांस्यपदक पटकावून ठाणे जिल्ह्यासह देशाचा गौरव वाढवणाऱ्या युवा धावपटू शौर्या अंबुरेचा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेत शौर्याने १३.५९ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. यासोबतच १३.७० सेकंदांचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचे महापौरांनी कौतुक करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शौर्याचे आई-वडील अविनाश अंबुरे आणि रूपाली अंबुरे, प्रशिक्षक डॉ. अजित कुलकर्णी, अभिनेते मंगेश देसाई, छत्रपती पुरस्कार प्राप्त अद्वैता मांगले आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या हिमानी परब उपस्थित होते.

शौर्याने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश ठाण्यातील नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या कामगिरीमुळे ठाणे शहराचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढला असून, भविष्यातही तिने देशासाठी अशीच उत्तुंग कामगिरी करावी, अशा शुभेच्छा महापौरांनी दिल्या.