कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य महिला मेळावा उत्साहात संपन्न

कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य महिला मेळावा उत्साहात संपन्न

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी कल्याण मुरबाड रोडवरील कांबा येथील मोनालिसा हॉलमध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

महिलांचे सक्षमीकरण, त्यांचे हक्क, सामाजिक सहभाग वाढविणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करणे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला कार्यकर्त्यांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष खासदार सुरेश तथा बाळ्यामामा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला संघटन, महिलांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान तसेच महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी संघटित होऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, आपल्या हक्कांसाठी जागरूक राहावे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, हा मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे मेळाव्याला उत्साहपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

विशेष प्रतिनिधी : सौ. रूपाली मनोज बैसाने