पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन; अहिरे खुर्द येथे ९३ लाखांच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन
धरणगाव, दि. २१ : दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. बंधारे, नालाखोलीकरण आणि भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातून पाणीसाठा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. अहिरे खुर्द येथील बंधाऱ्यासह जिल्ह्यात नऊ गेटेड सिमेंट बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. तसेच साठवण बंधाऱ्यांना फळ्या बसविण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड देत ग्रामस्थांनी वनराई बंधारे उभारावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील अहिरे खुर्द येथे अंजनी नदीवर जिल्हा जलसंधारण महामंडळांतर्गत सुमारे ९३ लाख रुपये खर्चाच्या गेटेड सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भूमिपूजनस्थळ नदीपात्रात असल्याने पालकमंत्र्यांनी गावापासून सुमारे एक किलोमीटरचा प्रवास ट्रॅक्टरमधून केला.
### सात कोटींचा पूल लवकरच खुला होणार
अहिरे खुर्द आणि अहिरे बुद्रुक या गावांना जोडणाऱ्या सात कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होताच पुलाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तसेच भवरखेडा-पळासखेडा रस्त्यावरील पूल, सोनवद-खर्दे मार्गावरील पूल आणि पाळधी-झुरखेडा-दहिदुल्ला मार्गावरील विहीरफाट्याजवळील पूल अशा एकूण चार कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
### ट्रॅक्टर सफरीतून राजकीय टिप्पणी
भूमिपूजनासाठी जाताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ट्रॅक्टरमधून प्रवास केला. भाजपचे भगवान महाजन ट्रॅक्टर चालवत होते. यावेळी महाराष्ट्राचे स्टेअरिंग भाजपकडेच, अशी मिश्कील टिप्पणी करण्यात आली. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे उपअभियंता अमोल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पवन पाटील यांनी केले, तर आभार पोलीस पाटील सुरेश चव्हाण यांनी मानले.
यावेळी युवा नेते प्रतापराव पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, पावन पाटील, अजय पाटील, रवी चव्हाण, संजय पाटील, भगवान महाजन, पी. सी. पाटील, मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, भैय्या मराठे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.