अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतिभेला ‘आपलं मंत्रालय’चे बळ

अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतिभेला ‘आपलं मंत्रालय’चे बळ

मुंबई, दि. ५ : मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक तसेच कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आपलं मंत्रालय’ हे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या गृहपत्रिकेच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या साहित्यिक अभिव्यक्तीला वाव देण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

दीपावलीनिमित्त ‘आपलं मंत्रालय’च्या वतीने मंत्रालयातील परिषद सभागृहात काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्रालयातील विविध विभागांमध्ये अनेक कवी आणि साहित्यप्रेमी कार्यरत आहेत. त्यांच्या अंगभूत साहित्यिक कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आपल्या कविता व साहित्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ‘आपलं मंत्रालय’ हे केवळ मासिक नसून मंत्रालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे व्यासपीठ आहे. त्यामुळे सर्वांनी या मासिकाशी आपलेपणाने जोडून सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या लेखनातून ते अधिक समृद्ध करावे, असे आवाहन ब्रिजेश सिंह यांनी केले.

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ होते आणि तिला विचार करण्याची नवी दृष्टी मिळते. सामान्य व्यक्तीला असामान्य बनविण्याची ताकद वाचनात आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची आवड जोपासावी. शासनाकडून साहित्य, कला आणि संगीत क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

या काव्यसंध्येत सतीश मोघे, डॉ. नामदेव भोसले, मीनाक्षी पाटील, लीना संखे, अंजली ढमाळ, अजय भोसले, नामदेव कोळी, डॉ. जगदीश मोरे, शशी डंभारे आणि प्रवीण कुलकर्णी यांनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. सामाजिक, सांस्कृतिक, मानवी नातेसंबंध आणि जीवनातील विविध भावभावनांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमधून उमटले. प्रत्येक कवितेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी संचालक किशोर गांगुर्डे, संचालक गोविंद अहंकारी, उपसंचालक वर्षा आंधळे आणि मुख्यमंत्री यांच्या जनसंपर्क अधिकारी कीर्ती पांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात नामदेव कोळी यांच्या ‘वाघूर’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दीपावलीच्या उत्सवी वातावरणात रंगलेल्या या काव्यसंध्येने मंत्रालयातील साहित्यिक वातावरण अधिक समृद्ध केले.