शिक्षकांच्या शंभर टक्के वेतनासाठी पाठपुरावा करणार, आमदार कौस्तुभ गावडे यांची ग्वाही
इचलकरंजी, दि. ६ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या अलका आनंदा कदम आणि मालती माने विद्यालयाच्या मनिषा संदीप कांबळे या दोन शिक्षिकांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्यगीताने झाली. सरस्वती हायस्कूलच्या गीतमंचाने ईशस्तवन सादर केले. त्यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. शाळा क्रमांक २७ मधील विद्यार्थिनींनी शिक्षकांना अभिवादन करून पुष्पवृष्टी केली, तर बापुजी साळुंखे हायस्कूलच्या एनसीसी पथकाने मानवंदना दिली.
प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. शिक्षण समितीच्या सभापती विद्या साळुंखे यांनी महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजना राबविण्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच शिक्षकांचे शंभर टक्के वेतन शासनाकडून मिळावे, अशी मागणी केली. उपमहापौर अनिल डाळ्या यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका पालकांइतकीच महत्त्वाची असल्याचे नमूद केले. आयुक्त पल्लवी पाटील यांनी जबाबदार नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करीत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आमदार कौस्तुभ गावडे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यात शिक्षकांचे योगदान अनमोल असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत त्यांच्या शंभर टक्के वेतनाचा प्रश्न शासनदरबारी मांडून तो मार्गी लावण्यासाठी गांभीर्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. अनिल मडके यांनी मार्गदर्शन करताना २०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या नावाने हाक मारणे, त्यांचा सन्मान जपणे, त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण करणे आणि त्यांच्यात जिज्ञासा, करुणा व सहानुभूती विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने आपले ज्ञान अद्ययावत करावे. तसेच अशैक्षणिक कामांच्या ओझ्यातून मुक्त होऊन अध्यापनावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुरस्कारप्राप्त शिक्षिका अलका कदम आणि मनिषा कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव आणि कार्याची प्रेरणा उपस्थितांसमोर मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कुंभार व नामदेव गणबावले यांनी केले, तर प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांनी आभार मानले.
यावेळी परिवहन सभापती अरुणा बचाटे, महिला व बालकल्याण सभापती रूपाली सातपुते, प्रभाकरच्या सभापती सारिका पाटील, शिक्षण उपसभापती पुनम माळी, नगरसेविका विजया महाजन, रूपा भुगड, ज्योती पाटील, उपायुक्त अशोक कुंभार, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व नागरिक उपस्थित होते.