शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या

बुलढाणा, दि. २० सप्टेंबर : राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असून पावसाने मोठा खंड दिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपये मदत आणि सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. गेल्या ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले.

एका तरुण शेतकऱ्याने २० एकर सोयाबीन पीक मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपल्या शेताची पाहणी करावी, अशी विनंती या शेतकऱ्याने केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. कृषीमंत्र्यांच्या बुलढाणा दौऱ्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या दौऱ्याचा निषेध केल्याचेही त्यांनी सांगितले.

दुष्काळ हा राजकारणाचा विषय नसून संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आणि सरकारने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी निधीची कमतरता असल्याचे कारण देऊ नये. गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी प्रस्तावित ७८ हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारच्या कर्जमाफीच्या दाव्यांवरही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केले. बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन शेतकऱ्यांची नावे, तर दुसऱ्या यादीत एका शेतकऱ्याचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित शेतकऱ्याला केवळ ४० हजार रुपयांची कर्जमाफी मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन सपकाळ यांनी केले. सरकारने तातडीने मदत जाहीर न केल्यास काँग्रेसकडून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.