छटपूजेसाठी तलाव परिसरात स्वच्छता आणि सुरक्षेवर भर
ठाणे : छटपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. येत्या 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या छटपूजेसाठी शहरातील प्रमुख तलाव आणि घाट परिसरात स्वच्छता, सुरक्षा, प्रकाशव्यवस्था आणि आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.
आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी रायलादेवी, मासुंदा आणि उपवन तलाव परिसरात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेटिंग, स्वतंत्र सुरक्षा कॉरिडॉर आणि अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच तलाव परिसर आणि प्रवेशद्वारांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यात येणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक आणि आवश्यक औषधोपचारांची सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.
छटपूजेपूर्वी सर्व घाटांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, तलावांची स्वच्छता आणि एरिएशन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन आणि ध्वनीव्यवस्थेचीही तयारी करण्यात येत आहे.
15 आणि 16 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी सर्व संबंधित यंत्रणा कार्यरत राहणार असून, भाविकांना सुरक्षित आणि सुरळीतपणे धार्मिक विधी पार पाडता यावेत यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.