गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम

ठाणे, 24 ऑगस्ट 2026 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील प्रमुख रस्ते, गणेश मंडळांकडे जाणारे मार्ग, विसर्जन मिरवणुकीचे मार्ग तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विशेष खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शहरातील माजीवाडा, पातलीपाडा, कल्याण फाटा, तीन हात नाका तसेच कोपरी पूल परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. याबाबतची माहिती नगरअभियंता प्रशांत सोनग्रा यांनी दिली.

गणेशोत्सव काळात शहरात नागरिक तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या विशेष मोहिमेत मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, गणेश मंडळांकडे जाणारे मार्ग, विसर्जन मिरवणुकीचे मार्ग तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवरील खड्डे प्राधान्याने बुजविण्यात येत आहेत. खड्डे बुजविण्याच्या कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा याचीही संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी रस्त्यांची नियमित पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाहणीदरम्यान आढळून येणारे नवीन खड्डे तातडीने बुजविण्यात येणार आहेत.

ठाणे महानगरपालिका नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे किंवा रस्त्यांशी संबंधित समस्या निदर्शनास आल्यास त्या महापालिकेच्या संबंधित यंत्रणेकडे कळवाव्यात, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

खड्डा निदर्शनास येताच 24 तासांत दुरुस्ती

महापालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांची नियमित पाहणी केली जात आहे. नागरिकांकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून खड्ड्याची माहिती मिळाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एखाद्या ठिकाणी खड्डा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत तो बुजविण्याचे काम करण्यात येत असल्याचे नगरअभियंता प्रशांत सोनग्रा यांनी स्पष्ट केले.