मराठा समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांचा निधी देणार
धरणगाव, जळगाव प्रतिनिधी : विवाहासाठी जोडीदार निवडताना केवळ सरकारी नोकरी किंवा बंगल्याची अपेक्षा न ठेवता निर्व्यसनी, कष्टाळू आणि चांगल्या स्वभावाच्या तरुणांना पसंती द्यावी. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेती आणि व्यवसायाकडे वळावे. समाजाने संघटित राहून प्रगती साधावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मराठा समाजाच्या मंगल कार्यालयासाठी आमदार व खासदार निधीतून ५० लाख रुपये मंजूर करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
अखिल भारतीय सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळ, जळगाव यांच्या वतीने रविवारी (दि. २२) धरणगाव येथे भव्य मराठा समाज मेळावा, वधू-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मंगल कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मराठा समाज मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी धरणगाव पंचायत समितीच्या माजी सभापती सुरेखा अनिल पाटील होत्या.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील हजारो समाजबांधव आणि माता-भगिनी या मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी विवाहानंतर मुला-मुलींनी मोबाईलचा अतिवापर टाळावा आणि त्याचा योग्य कामासाठी उपयोग करावा, असे सांगितले. मंगल कार्यालयाचे काम वर्षभरात पूर्ण करण्यासाठी उपस्थित मंत्री, खासदार आणि आमदारांनी आर्थिक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे – स्मिता वाघ
आजच्या स्पर्धात्मक युगात तरुणांनी केवळ सरकारी किंवा खासगी नोकरीवर अवलंबून न राहता उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात संधी निर्माण कराव्यात. सुसंस्कृत आणि सक्षम समाज घडविण्यात महिलांचे, विशेषतः आईचे योगदान महत्त्वाचे असल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले.
सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण निर्णय
मेळाव्यात विवाहेच्छुक युवक-युवतींनी व्यासपीठावरून स्वतःचा परिचय करून देत भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या. यासोबतच समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. साखरपुडा, मेहंदी आणि प्री-वेडिंग कार्यक्रमांमधील अनावश्यक खर्च तसेच अंत्यविधीप्रसंगी भाषणे करण्याच्या प्रथा बंद करण्याबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि व्यावसायिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दीड हजार भगिनींना दिवाळी भेट
केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी मेळाव्यानिमित्त समाजातील माता-भगिनींसाठी एक हजार ५०० वाण आणि भेटवस्तू पाठविल्या होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, मध्य प्रदेशातील खंडवा मतदारसंघाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री गुलाबराव देवकर, धरणगावच्या नगराध्यक्षा लीलाताई सुरेश चौधरी, प्रबोधनकार ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, जानकीराम पाटील, गणेश चव्हाण, समाजाचे अध्यक्ष सोमनाथ मराठे, माजी अध्यक्ष भानुदास पाटील, पी. के. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हजारो समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष सोमनाथ रघुनाथ मराठे यांनी केले. समाजातील शिक्षक व शिक्षिकांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक पी. के. पाटील यांनी आभार मानले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी समाजाचे विद्यमान व माजी पदाधिकारी, संचालक मंडळ, महिला मंडळ, युवा मंडळ आणि विविध गावांतील समाजबांधवांनी परिश्रम घेतले.