महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड क्रीडा संकुलाला अचानक भेट

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड क्रीडा संकुलाला अचानक भेट
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड क्रीडा संकुलाला अचानक भेट

बीड प्रतिनिधी) दि. १४ राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देत तेथील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि आवश्यक सुविधांची माहिती जाणून घेतली.

क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि पुढील नियोजनाची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतली. युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविणे आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

बीड जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा, दर्जेदार सरावाचे वातावरण आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच क्रीडा संकुलातील सर्व विकासकामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी विविध खेळांचा सराव करणाऱ्या मुलांशी आस्थेने संवाद साधत त्यांना कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, प्रशिक्षणादरम्यान कोणत्या अडचणी येतात आणि भविष्यातील त्यांच्या क्रीडा आकांक्षा काय आहेत, याबाबत माहिती घेतली. बीड जिल्ह्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविणारे खेळाडू घडावेत, यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या पाहणी दौऱ्यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.