चाकण एमआयडीसीतील पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुधारणांना गती
तळेगाव चाकण शिक्रापूर मार्ग 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
पुणे, दि. 14 : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गासह चाकण एमआयडीसी आणि लगतच्या परिसरातील पायाभूत सुविधांच्या सुधारणांना गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.
चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डुडी यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, एमएसआरडीसी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी संपूर्ण मार्गावरील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवून मार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. संबंधित रस्ते मालकीच्या यंत्रणांनी तांत्रिक सल्लागारांनी निश्चित केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, पाणी साचणारी ठिकाणे, नाले आणि नाल्यांवरील अतिक्रमणांची पाहणी करून संबंधित यंत्रणांनी जमीन प्राधिकरणाशी समन्वय साधावा. पुढील 15 दिवसांत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील एचपी चौक ते चाकण या भागाचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करून त्याची माहिती पुढील आठ दिवसांत तांत्रिक सल्लागारांना उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच चाकण एमआयडीसी आणि लगतच्या प्रभावक्षेत्रातील विविध विभागांच्या अखत्यारितील रस्त्यांची मालकी निश्चित करून त्याची माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यावर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक जंक्शनची रचना आणि आकारमान मानकांनुसार सुधारावे तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पार्किंग आणि नो पार्किंगची ठिकाणे निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
चाकण एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात पावसाच्या पाण्याचा प्रभावी निचरा होण्यासाठी आवश्यक ठिकाणी स्टॉर्म वॉटर ड्रेन आणि चेंबर्स उभारण्यात यावेत. संपूर्ण क्षेत्रासाठी स्वतंत्र आणि सर्वंकष पावसाच्या पाण्याच्या निचरा व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले.
पाणी साचणारी ठिकाणे, नाले, नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आणि विद्यमान निचरा व्यवस्था यांचा एकत्रित अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यात येणार आहेत. संबंधित विभागांनी उपलब्ध माहिती, आराखडे आणि रेखाचित्रे तांत्रिक सल्लागारांना उपलब्ध करून द्यावीत, असेही निर्देश देण्यात आले.
विद्यमान रस्ता सुधारणा आराखडे, रेखाचित्रे आणि प्रस्तावांचा अभ्यास करून पावसाच्या पाण्याचा निचरा, रस्त्यांचे कडे, जंक्शन, वाहनतळे, सौंदर्यीकरणाची ठिकाणे आणि वाहतूक व्यवस्थेशी संबंधित आवश्यक बाबींचा समावेश असलेला दीर्घकालीन रस्ता सुधारणा आराखडा पुढील दोन महिन्यांत तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी निगराणी यंत्रणेचा प्रभावी वापर करून वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि वाहतुकीतील अडथळ्यांची ठिकाणे निश्चित करावीत. सार्वजनिक वाहतूक आणि बससेवा अधिक सक्षम करून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात यावे. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करून त्याचा सातत्याने आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.