संघर्ष समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले

संघर्ष  समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले
संघर्ष  समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नागरी सत्कार

मुंबई, दि. १४ : सामाजिक चळवळ, संघटनबांधणी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, ते संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गौरव केला.

केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा यशवंतराव चव्हाण केंद्र येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार प्रवीण दरेकर, रामदास आठवले यांचे कुटुंबीय आणि चाहते उपस्थित होते.

संघर्षातून घडलेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी अखंड निष्ठा राखणारे रामदास आठवले हे देशातील सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रभावी प्रतीक आहेत. दलित पँथर चळवळीपासून राष्ट्रीय राजकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या कार्यकर्त्याचा प्रवास आहे. सामाजिक चळवळ, संघटनबांधणी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

संघर्षातून नेतृत्व घडले असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीही कटुता आली नाही. सर्व समाजघटकांशी संवाद, सर्व पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि लोकांना आपलेसे करण्याची त्यांची शैली ही त्यांच्या यशामागील मोठी ताकद आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महायुतीला आंबेडकरी विचारांशी जोडण्यात रामदास आठवले यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांपासून लंडनमधील त्यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाच्या जतनापर्यंत अनेक महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. बाबासाहेबांच्या विचारांशी तडजोड न करता त्यांनी सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार केला आहे. रामदास आठवले हे दिलदार मित्र, कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेतृत्व आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पुढील सार्वजनिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रामदास आठवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त त्यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रभावी नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार काढले.

रामदास आठवले यांनी गेली दहा वर्षे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याचे कार्य केले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढीपासून ते ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांचे मोठे योगदान आहे.

दलित पँथर चळवळीपासून संसदेपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आठवले यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सातत्याने जपले असून संविधानाच्या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली. दीक्षाभूमीचा विकास, लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच सामाजिक न्यायाशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

रामदास आठवले यांची लोकाभिमुख कार्यपद्धती, हसरा स्वभाव आणि सर्वपक्षीय मैत्री जपण्याची भूमिका यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. सामाजिक न्यायाची मशाल अशीच प्रज्वलित ठेवत समता आणि संविधान मूल्यांसाठी त्यांचे कार्य पुढेही सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त गौरव करताना सांगितले की, आठवले यांनी केवळ मंत्री म्हणून नव्हे तर तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देणारे लोकनेते म्हणून देशभर ठसा उमटवला आहे. विविध जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली असून वंचित घटकांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. देशसेवेची त्यांची वाटचाल अधिक व्यापक व्हावी आणि भविष्यात त्यांच्यावर आणखी मोठ्या जबाबदाऱ्या सोपविल्या जाव्यात, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त गौरव करताना सांगितले की, सलग दहा वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात प्रभावीपणे कार्य करणे ही मोठी कामगिरी आहे. समाजातील सर्वसामान्य, वंचित आणि गरीब घटकांचा विश्वास संपादन करण्यात आठवले यशस्वी ठरले आहेत.

दलित पँथर चळवळीपासून सुरू झालेल्या त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत भुजबळ म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आंबेडकरी चळवळ बळकट केली. सामाजिक न्याय, वंचितांच्या हक्कांसाठीची लढाई, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने नेतृत्व केले आहे. ते केवळ मंत्री नसून चळवळीतून घडलेले कार्यकर्ते आहेत. संघर्ष, जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आठवले यांच्या मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त त्यांचा गौरव करताना सांगितले की, सांगलीच्या क्रांतीभूमीतून घडलेला रामदास आठवले यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास प्रेरणादायी आहे. दलित पँथर चळवळीपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राष्ट्रीय अध्यक्ष, विधिमंडळ ते संसद असा त्यांचा समृद्ध राजकीय प्रवास राहिला आहे.

आंबेडकरी विचार आणि सामाजिक समतेचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री म्हणून गेल्या दहा वर्षांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या प्रभावी संसदीय कामगिरीबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण काव्यशैली, मार्मिक टिप्पणी आणि सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव यामुळे ते देशभर लोकप्रिय असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

आमदार प्रवीण दरेकर यांनी आठवले यांच्या मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त गौरव करताना त्यांना आंबेडकरी चळवळीतील लोकप्रिय आणि जनसामान्यांशी नाळ जुळलेले नेतृत्व असल्याचे म्हटले. दलित पँथर चळवळीपासून लोकसभा, राज्यसभा आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. देशभरातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारे ते जननेते आहेत.

विविध राजकीय परिस्थितींमध्येही संयम, समन्वय आणि मैत्री जपण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय असल्याचे नमूद करून दरेकर यांनी आठवले यांनी उभारलेली आंबेडकरी चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रचनात्मक कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. त्यांच्या दीर्घायुष्याच्या आणि सामाजिक परिवर्तनासाठीच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागरी सत्काराला उत्तर देताना आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाच्या विचारांनी प्रेरित होऊन सार्वजनिक जीवनात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

दलित पँथर चळवळीपासून महाराष्ट्र मंत्रिमंडळ, संसद आणि केंद्रातील मंत्रिपदापर्यंतच्या प्रवासात सर्वसामान्य, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने काम करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर काम करण्याचा निर्णय समाजहित आणि बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने घेतल्याचे सांगत त्यांनी सहकार्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी सामाजिक न्याय, समता आणि विकासासाठीची आपली बांधिलकी कायम राहील, अशी ग्वाही दिली. देशभरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच हा प्रवास शक्य झाल्याचे सांगत त्यांनी उपस्थित मान्यवर, आयोजक आणि कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.