विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती
ठाणे, 15 ऑगस्ट 2026
80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विकसित भारत 2047, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतला.
ड्रोन, क्षेपणास्त्रे, सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल, आधुनिक युद्धनौका आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षण प्रणालीमुळे भारताची संरक्षण क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांमुळे भारत संरक्षण उत्पादन क्षेत्रात सक्षम राष्ट्र म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आला असून अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली शांतता, सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीमुळे देशाच्या दुर्गम भागातही विकासाला गती मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
विकसित भारत 2047 हे केवळ घोषवाक्य नसून 140 कोटी भारतीयांचा संकल्प आहे. शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांच्या सहभागातून हा संकल्प पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे पराक्रम, संतांची शिकवण, मुंबईची आर्थिक ताकद, पुण्याचे ज्ञान, विदर्भाची सुपीक शेती आणि कोकणचे सामर्थ्य यामुळे महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचे नेतृत्व करत आहे. देशाच्या वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक असेल, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा असल्याचे सांगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 लागू करून निवडणुकीतील आश्वासन पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक शेतीसाठी सिंचन, सुधारित अवजारे, कृषी तंत्रज्ञान आणि विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन गृहनिर्माण धोरणाद्वारे गरीब आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुनर्विकासाच्या प्रक्रियेत अधिकृत किंवा अनधिकृत रहिवाशांवर अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला न्याय, हक्क आणि सन्मानाने घर मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी 44 कोटी रुपयांचे विशेष निधी अभियान सुरू करण्यात आले आहे. रस्ते, पाणी, मलनिस्सारण, नागरी सुविधा आणि शाश्वत शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो, ठाणे बोरिवली बोगदा, धोडबंदर मार्ग, वाहतूक सुधारणा, पुनर्विकास आणि ओपन स्पेससह विविध प्रकल्पांमुळे ठाण्याचे भवितव्य बदलणार आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन हे प्रकल्प राबविण्यात येतील आणि कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला असून आरोग्य, कृषी, शिक्षण, सुरक्षा आणि डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडविणारे उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यात राज्यातील सर्वात मोठे 900 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले जात असून नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून 35 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला असून 268 जणांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कृषी विलगीकरण योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून ॲग्री स्टॅक प्रणालीवर 97 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषद योजनांमधून 2100 लाभार्थ्यांना सुधारित शेती अवजारे, सिंचन साहित्य, तारेचे कुंपण, प्लास्टिक लाइनिंग आणि इतर साहित्य वितरित करण्यात आले आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नवाढीसाठी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा परिषद शाळेतील 15 विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी मिळाली. ग्रामीण भागातील विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ बनू शकतात, हा विश्वास या उपक्रमामुळे अधिक दृढ झाला असल्याचे शिंदे म्हणाले.
ठाणे शहरात 6059 एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारवड ॲप सुरू करण्यात आले असून पोलीस आणि जनतेतील दरी कमी करण्यासाठी पोलीस मित्र उपक्रम राबविण्यात येत आहे. सायबर गुन्ह्यांविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून डिजिटल युगात नागरिकांचे संरक्षण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि ठाणेकर नागरिक उपस्थित होते.