ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी : ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, कायदेशीर संरक्षण आणि शासनाच्या विविध योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहीद भगतसिंग उद्यान येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. एस. बी. सावेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, कायदेशीर तरतुदी आणि उपलब्ध संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे जीवन जगता यावे, त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहावे तसेच आर्थिक सुरक्षितता आणि आवश्यक सार्वजनिक मदत मिळावी, यासाठी शासनाने निश्चित केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणाची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा महानगरपालिकेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाना बोंगार्डे, दोरुगडे, रुईकर, विष्णू नेतले, शिवाजी जगताप, कांबळे गुरुजी यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेचे सहायक आयुक्त सुनील शिंदे, रामचंद्र कांबळे, विधी अधिकारी भावना देवरा, क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, भांडार अधीक्षक गणेश शिंदे, सुभाष आवळे, कृष्णा आवळे आणि राजश्री जाधव यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी मनोगते व्यक्त करून उपक्रमाचे कौतुक केले. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.