इंडियन वॉक फॉर नेशन ३.०चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास

इंडियन वॉक फॉर नेशन ३.०चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास

मुंबई, दि. २४ : आर्मी ब्रॅट अंजली साखरे यांच्या संकल्पनेतून ASVFI Foundation आणि Valiant Fame Icon यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन वॉक फॉर नेशन ३.० या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. World Record of Excellence, England यांच्या जागतिक विक्रम प्रयत्नांतर्गत आयोजित या Heritage, Cultural and Patriotic Runway मध्ये देशभक्ती, भारतीय संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

कारगिल विजय दिवस आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात वीर जवानांना मानवंदना देण्यात आली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमात सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी १ लाख १ रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमातील भावनिक क्षण म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी सादर केलेला शहीद कॅप्टन विनायक गोरे हा एकपात्री प्रयोग. शहीद जवानांचे बलिदान, वीरमाता आणि वीरपित्यांच्या भावना तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे मांडले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या देशभक्तीपर रनवेमध्ये ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ९४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत १०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. विविध राज्यांची संस्कृती, भारतीय परंपरा आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवत सहभागी नागरिकांनी वीर जवानांना मानवंदना अर्पण केली.

या उपक्रमात मेजर प्रांजल जाधव, ब्रिगेडियर सुशील भसीन, ब्रिगेडियर उदयकुमार देशमुख, कर्नल तुषार जोशी, लेफ्टनंट कर्नल नीता चव्हाण, लेफ्टनंट कर्नल नितीशा चौहान, लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, लेफ्टनंट कर्नल धरमदत्त गोयल, कॅप्टन प्रदीप पट्टनायक, कमांडर विजय प्रताप सिंग, लेफ्टनंट कमांडर निधी तनेजा, फ्लाईंग ऑफिसर इतिशा, सार्जंट विवेक घोसाळकर तसेच अनेक माजी सैनिक आणि माझगाव डॉकचे चीफ मॅनेजर विज्ञानेश मासावकर यांनी सहभाग नोंदविला.

या भव्य उपक्रमाची दखल घेत World Record of Excellence, England चे उपाध्यक्ष संजय पंजवानी यांच्या हस्ते कार्यक्रमाला Provisional World Record Certificate प्रदान करण्यात आले. भारतीय संस्कृती, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाने जागतिक विक्रमाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

सैनिकांच्या बलिदानाची परतफेड कधीच होऊ शकत नाही. मात्र त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे प्रत्येक भारतीयाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. इंडियन वॉक फॉर नेशन हा केवळ रनवे नसून राष्ट्राला दिलेली सामूहिक मानवंदना आहे, असे आर्मी ब्रॅट अंजली साखरे यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी Bank of India, IndianOil, LIC, Pitambari, NM तसेच विविध सहकारी संस्था, प्रायोजक, भागीदार, स्वयंसेवक आणि सहभागी नागरिकांचे सहकार्य लाभले. त्यांच्या योगदानामुळे इंडियन वॉक फॉर नेशन ३.० हा देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी सोहळा ठरला.