पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर

पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर
पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर
पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील लोकनेते प्रभाग ब प्रभाग समिती कार्यालयात १० ऑक्टोबर रोजी महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे २२५ लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन महापौर नितीन पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग समिती ब चे सभापती मधु पाटील, नगरसेविका उषा अजित अडसूळ आणि नगरसेवक समीर कदम उपस्थित होते. महापौर नितीन पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर ममता प्रितम म्हात्रे यांनी शिबिराचा उद्देश आणि आरोग्य सेवांची माहिती दिली.

या शिबिरात महिलांसाठी विविध आजारांची मोफत तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. सांधेदुखी, गुडघेदुखी, हात-पायांना सूज येणे, मुंग्या येणे, नसांशी संबंधित त्रास तसेच मान, पाठ आणि कंबरदुखी यांसारख्या समस्यांची तपासणी करण्यात आली. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग आणि दंतरोग तपासणीची सुविधाही देण्यात आली.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या स्तनाचा आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीसह गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच सिकलसेल आजार आणि रक्तक्षय तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पंडित, डॉ. भक्तराज भोईटे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

गेल्या चार दिवसांपासून सेवा संकल्प अभियानांतर्गत महापालिकेच्या चारही प्रभागांत महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर तपासणी व मार्गदर्शन मिळत आहे. विशेषतः स्तनाचा आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी महापालिकेचे आभार मानत समाधान व्यक्त केले.