दशावतारातून मानवी उत्क्रांतीचा प्रवास समजून घेणे काळाची गरज

दशावतारातून मानवी उत्क्रांतीचा प्रवास समजून घेणे काळाची गरज

ठाणे, दि. ९ ऑक्टोबर : भारतीय संस्कृतीतील दशावतार आणि मानवी उत्क्रांती यांचा परस्परसंबंध उलगडून सांगताना ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र पाटणकर यांनी दशावतारामागील जीवनदृष्टी, मानवी स्वभाव आणि उत्क्रांतीच्या प्रवासावर प्रकाश टाकला. दशावताराकडे केवळ धार्मिक किंवा पौराणिक कथांच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यामागील जीवनमूल्ये आणि मानवी जीवनाशी असलेले नाते समजून घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि मराठी भाषा सप्ताहानिमित्त महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात दशावतार आणि उत्क्रांती या विषयावर ज्येष्ठ निवेदक आणि विचारप्रवर्तक राजेंद्र पाटणकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्यानात पाटणकर यांनी दशावतारातील क्रम आणि उत्क्रांतीची संकल्पना यांचा संबंध स्पष्ट केला. जलचरांपासून अधिक जटिल जीवसृष्टीकडे आणि मानवाकडे झालेल्या प्रवासाचे प्रतीक म्हणून दशावताराकडे पाहता येते, असे त्यांनी नमूद केले.

उत्क्रांतीची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी मानवी शरीरातील पेशींमध्ये होणारे बदल, जन्मापासून वृद्धत्वापर्यंत शरीरात घडणारे परिवर्तन आणि निसर्गाशी असलेले मानवी शरीराचे नाते सोप्या उदाहरणांतून समजावून सांगितले. परिस्थिती आणि गरजांनुसार जीवसृष्टीत बदल घडत असतात. उत्क्रांती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दशावतारातील विविध अवतारांमधून मिळणाऱ्या जीवनमूल्यांचे विश्लेषण करताना मत्स्य अवतारातून संरक्षण, कूर्म अवतारातून आधार, वराह अवतारातून संकटांवर मात करण्याची क्षमता, तर नरसिंह अवतारातून प्रतिकूल परिस्थितीत मार्ग शोधण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले. वामन अवतार नम्रतेचा, परशुराम शिस्तीचा, प्रभू राम कर्तव्य आणि आदर्श जीवनाचा, तर भगवान कृष्ण बुद्धी, युक्ती आणि योग्य निर्णयक्षमतेचा संदेश देतात. बुद्ध अवतारातून शांतता आणि साधनेचे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दशावतारातील कथा केवळ पौराणिक घटना म्हणून न पाहता त्यांमधील जीवनमूल्ये आजच्या मानवी जीवनाशी जोडणे आवश्यक आहे. या कथांमधून मिळणारे संदेश समजून घेतल्यास जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन विकसित होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

व्याख्यानानंतर उपस्थितांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे कार्यक्रमाला संवादात्मक स्वरूप प्राप्त झाले. दशावतार, मानवी जीवन आणि उत्क्रांती यांचा वेगळ्या दृष्टिकोनातून घेतलेला हा वेध उपस्थितांसाठी ज्ञानवर्धक आणि विचारप्रवर्तक ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभारी उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांनी राजेंद्र पाटणकर यांचे आभार मानले.