पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी इचलकरंजीत ३१ नळजोडण्या बंद

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी इचलकरंजीत ३१ नळजोडण्या बंद
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी इचलकरंजीत ३१ नळजोडण्या बंद

इचलकरंजी, दि. २६ : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नळांना तोट्या न बसविणाऱ्या तसेच पाणीपट्टी थकबाकी असलेल्या मिळकतधारकांच्या ३१ घरगुती नळजोडण्या खंडित करण्यात आल्या.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार २३ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा विभाग आणि कर विभागाच्या संयुक्त पथकाने प्रभाग क्रमांक २१ आणि २४ मध्ये ही कारवाई केली.

यामध्ये प्रभाग क्रमांक २४ मधील २५, तर प्रभाग क्रमांक २१ मधील ६ अशा एकूण ३१ नळजोडण्या बंद करण्यात आल्या. संबंधित नळजोडण्यांना तोट्या नसणे आणि पाणीपट्टीची थकबाकी असणे ही कारवाईची प्रमुख कारणे होती.

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी घरगुती तसेच सार्वजनिक नळजोडण्यांना तोट्या बसविणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेच्या जलसंधारण आणि पाणी बचत मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.