‘हर घर तिरंगा’ उपक्रमातून ठामपा विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जागर
ठाणे, दि. १३ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांमध्ये ९ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज बल्लाळ सभागृहात मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांचा विशेष देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, पथनाट्य आणि फ्यूजन सादरीकरणातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याविषयीचा अभिमान व्यक्त केला. त्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे सभागृहात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
शाळा क्रमांक ११२ मधील विद्यार्थ्यांनी ‘माँ से है माटी, माँ से है तिरंगा’, शाळा क्रमांक २९ मधील विद्यार्थ्यांनी ‘बढ़ते चलो’, तर शाळा क्रमांक ६ मधील विद्यार्थ्यांनी ‘तिरंगा’ या गीतावर सादरीकरण केले. शाळा क्रमांक १२६ मधील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ या संकल्पनेवर प्रभावी पथनाट्य सादर करून राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
शाळा क्रमांक ९८ मधील विद्यार्थ्यांनी ‘ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू’, शाळा क्रमांक ५३ मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर फ्यूजन साँग, तर शाळा क्रमांक ७३ मधील विद्यार्थ्यांनी ‘देस रंगीला’ या गीतावर आकर्षक नृत्य सादर केले. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही देशभक्तीपर नृत्य सादर केले.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी तिरंगा राखी अभियान, सीमेवरील जवानांना पत्रलेखन आणि सायकल तिरंगा रॅली यांसारखे उपक्रमही राबविण्यात आले.
या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, उपायुक्त दीपक झिंजाड, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, गटअधिकारी संगीता बामणे यांच्यासह मनपा शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ राष्ट्रध्वज फडकविण्यापुरते मर्यादित न ठेवता देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळत आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय अभियानातील सहभाग अधिक व्यापक झाला असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले. त्यांनी सर्वांना ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशभक्तीपर कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
‘प्रत्येक घरात तिरंगा आणि प्रत्येक मनात देशप्रेम’ हा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ठाणे शहरातील स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिक वाढला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक सुरेश पाटील यांनी केले.