राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’ ग्रंथाचे प्रकाशन

राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’ ग्रंथाचे प्रकाशन

नेतृत्वगुण शिकायचे असतील तर अटलजींचे जीवन अभ्यासावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई :

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्वामुळे प्रेरित होऊन आपण राजकारणात आलो. भावी पिढ्यांना नेतृत्वगुण, राजकारणातील शालीनता आणि नीतिमत्ता शिकायची असेल तर त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे सार्वजनिक जीवन अभ्यासावे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे मंगळवारी (दि. ३०) अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘अटल संस्मरण’ या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार म्हणून कार्य केलेले अशोक टंडन यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.

अटलजी हे उत्कृष्ट वक्ते, थोर विचारवंत आणि आदर्श लोकशाहीवादी नेते होते. नेता कसा असावा तसेच विरोधी पक्षनेता कसा असावा याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते, असे राज्यपालांनी सांगितले. उत्तरपूर्व भारतातील कठीण परिस्थितीत पक्षाचे काम करताना अटलजी कार्यकर्त्यांना प्रेरणा देत असत. विरोधी पक्षात असताना आणि पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांच्या विचारांमध्ये व वागण्यात कोणताही बदल झाला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

अटलजींनी राजकारणात कधीही शॉर्टकट स्वीकारला नाही. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा अणुऊर्जेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना मूल्ये आणि नीतिमत्ता असणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

‘अटल संस्मरण’ प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारे – आशिष शेलार

यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ‘अटल संस्मरण’ हा अटलजींच्या जीवनावरील महत्त्वपूर्ण दस्तऐवज असल्याचे सांगितले. लेखक अशोक टंडन यांनी अनेक वर्षे अटलजींसोबत काम केले असल्याने हे पुस्तक वस्तुनिष्ठ, प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारे झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन संघर्षमय होते. ते अमोघ वक्ते आणि सुसंस्कृत राजकारणी होते. लोकशाही ही संवादातून मजबूत होते, हे त्यांनी दाखवून दिले. सहमतीचे राजकारण हीच त्यांची शिकवण होती, असे शेलार म्हणाले.

अटलजींच्या विचारांमध्ये कधीही कटुता नव्हती. कवी हृदय असलेले अटलजी प्रसंगी कठोर निर्णय घेण्यासही सक्षम होते. देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची ताकद जगासमोर आली, असेही शेलार यांनी सांगितले.

अशोक टंडन यांनी सांगितल्या अटलजींच्या आठवणी

लेखक अशोक टंडन यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळातील आठवणी सांगितल्या. अटलजींचे १३ दिवसांचे सरकार, त्या काळातील राजकीय घडामोडी आणि त्यांचे नेतृत्व याबाबत त्यांनी विविध किस्से सांगितले.

जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेला हा ग्रंथ अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली असल्याचे टंडन यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक अनुप जलोटा, रवींद्र संघवी, बिनॉय बी. यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.