मालमत्ता कर आकारणीसाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांमध्ये विशेष शिबिर
ठाणे, दि. १४ ऑगस्ट २०२६ : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कर आकारणीची प्रक्रिया सुलभतेने करता यावी, यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व नऊ प्रभाग समिती कार्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या मिळकतींची अद्याप मालमत्ता कर आकारणी झालेली नाही, तसेच ज्या मिळकतींमध्ये वाढ करण्यात आली आहे किंवा वापरात बदल झाला आहे, अशा मिळकतधारकांकडून मालमत्ता कर आकारणीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
मिळकत ज्या प्रभागाच्या कार्यक्षेत्रात येते, त्या संबंधित प्रभाग कार्यालयातील शिबिराला भेट देऊन अर्ज सादर करता येणार आहे. शिबिराच्या ठिकाणी मालमत्ता कर आकारणीसाठी अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला असून, अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून संबंधित कागदपत्रांसह तो जमा करावा.
प्राप्त अर्जांच्या आधारे संबंधित कागदपत्रांची तपासणी तसेच मिळकतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येऊन पुढील मालमत्ता कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
तरी संबंधित मिळकतधारकांनी विशेष शिबिराचा लाभ घेऊन मालमत्ता कर आकारणीसाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करावीत आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.