पनवेलमध्ये १०० फूट खोल पडलेल्या युवकाची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

पनवेलमध्ये १०० फूट खोल पडलेल्या युवकाची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

पनवेल, दि. ११ : कर्नाळा स्पोर्ट्सजवळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलावरून अंदाजे १०० फूट खोल पडलेल्या १६ वर्षीय युवकाची पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. १० नोव्हेंबर रोजी रात्री १०.२५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

उड्डाणपुलावर फटाके फोडण्यासाठी गेलेला युवक खाली पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त साहित्य आणि मनुष्यबळ मागविण्यात आले. अग्निशमन जवानांनी नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य सुरू केले.

उड्डाणपुलाखालील घटनास्थळी पोहोचण्यासाठी दोन जवानांनी सुमारे दीड किलोमीटर अंतर पायी पार केले. त्यानंतर दोरखंड, बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि टॉर्चच्या साहाय्याने युवकाला सुरक्षितपणे वर काढण्यात आले. बचाव करण्यात आलेल्या युवकाचे नाव शिवांश दामले असून तो ओल्ड पनवेल येथील लाईन आळी परिसरातील रहिवासी आहे. सुटकेनंतर त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यात आले.

या बचावकार्यात उपअग्निशमन केंद्र अधिकारी शुभम राठोड, प्रमुख अग्निशमन विमोचक शिवा आडे, यंत्रचालक आकाश नलवडे व शिवलाल अलदर तसेच अग्निशामक शुभांगी घुले, शंकर वाकडे, विक्रांत सपकाळ, सुनील मोरे, प्रीतम पाटील, निकितेश डुकरे आणि प्रणय म्हसकर यांनी सहभाग घेतला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि समन्वय यामुळे युवकाचे प्राण वाचविण्यात यश आले. आयुक्त मंगेश चितळे यांनी या बचाव मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी आणि जवानांचे कौतुक करून अभिनंदन केले.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कर्नाळा स्पोर्ट्सजवळील नवीन उड्डाणपुलावर काही ठिकाणी काम सुरू असल्याने दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या परिसरात गर्दी करू नये तसेच उड्डाणपुलावर फटाके फोडू नयेत, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे यांनी केले आहे.