स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातून गौरव
पनवेल, दि. २ : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छोत्सव स्वच्छता ही सेवा २०२६ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर सफाई मित्र आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी आद्य वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महापौर नितीन पाटील, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, प्रभाग समिती डचे सभापती अजय बहिरा, नगरसेवक सुमित झुंजारराव, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सफाई मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वच्छ शहराच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान केला जात आहे.
कार्यक्रमात स्वामी इव्हेंट्स प्रस्तुत संगीतकार अमिर हडकर निर्मित बँड मेजर ए या संगीत कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी चित्रपट गीते, लोकगीते, भावगीते, छत्रपती शिवाजी महाराज आणि बुद्ध भीम गीते सादर करण्यात आली. नृत्य आणि हास्याच्या कार्यक्रमानेही उपस्थितांचे मनोरंजन केले.
महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम संगीतकार अमिर हडकर, आर जे डी महेश, सा रे ग म प फेम प्रीतम बावडेकर, पार्श्वगायक दर्शन साटम, पार्श्वगायिका सपना हेमण, स्वाती हरवंदे तसेच विविध रिअॅलिटी शोमधील नृत्य समूह आणि नामवंत वादकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
सफाई कर्मचाऱ्यांसाठी रॅपिड फायर या मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. विशेष म्हणजे काही सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतः रंगमंचावर येऊन गीते सादर केली. त्यामुळे कार्यक्रमाला अधिक उत्स्फूर्त वातावरण मिळाले. स्वच्छता दूत तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.