अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आश्रम उभारणीचा संकल्प

अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आश्रम उभारणीचा संकल्प
अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आश्रम उभारणीचा संकल्प

बेलापूर (मुंबई प्रतिनिधी) अनाथ, निराधार आणि वंचित बालकांना सुरक्षित निवारा, शिक्षण व उज्ज्वल भविष्य उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक उद्देशाने ज्ञानप्रसारक सांस्कृतिक शिक्षण बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र आणि VAYUNEX GLOBAL PRIVATE LIMITED यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वातवेद चूर्ण या उत्पादनाचा परिचय, आयुर्वेदिक औषधांविषयी मार्गदर्शन, व्यवसायाच्या संधी आणि अनाथ मुलांसाठी आश्रम उभारणीचा सामाजिक संकल्प जाहीर करण्यात आला.

सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी हॉटेल अश्वितन, साई स्वागत बिल्डिंग, सेक्टर १५, बेलापूर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत गुरव, संचालक महादेव पुरी, सानपाडा शाखा प्रमुख राजेश काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमात अॅड. प्रमोद शिंदे यांनी आयुर्वेदिक औषधांविषयी माहिती देत वातवेद चूर्णाची संकल्पना आणि उत्पादनाची वैशिष्ट्ये उपस्थितांसमोर मांडली. महादेव पुरी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली, तर निलेश पास्त्य यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी डॉ. सचिन तपशील यांचे महादेव पुरी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. दिलीप भोगे यांनी श्रीकांत गुरव यांचा सत्कार केला, तर राहुल गुरव यांच्या वतीने महादेव पुरी यांचा सन्मान करण्यात आला.

अनाथ मुलांसाठी आश्रम उभारण्याचा संकल्प

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अनाथ आणि निराधार मुलांसाठी आश्रम उभारण्याची घोषणा. या माध्यमातून बालकांना सुरक्षित निवारा, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा मानस आहे. या सामाजिक उपक्रमात दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमाला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भाग्यवान विजेत्यांना ठाणे शहरात २ बीएचके आणि १ बीएचके फ्लॅट, चारचाकी थार गाडी, दुचाकी, फ्रिज, मोबाईल यांसह विविध आकर्षक बक्षिसे देण्याची घोषणा करण्यात आली.

सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न

मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत गुरव यांनी कंपनीच्या वाटचालीची माहिती देताना सांगितले की, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कंपनीची सुरुवात करण्यात आली असून अल्पावधीतच कंपनीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी असून प्रत्येक सामान्य माणसाचे स्वतःच्या घराचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर आरोग्य आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले मनोगत

कार्यक्रमाला हर्ष गायकवाड, प्रमोद जाधव, अमोल कांबळे, पृथ्वी पाटील, गीता मेहता, राहुल महुलकर, पत्रकार गुरव, दिलीप भोगे, वाय. के. शर्मा, सुषमा कदम, चेतन पालके, रजनी कडोसे, सलमान इनामदार, प्रकाश गुरव, अनिल लोंढे, पल्लवी लोंढे, गणेश साळके, शुभांगी माने, संतोष माने, आकाश पवार, सोनिया गिल यांच्यासह परिवर्तन बाल विकास संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नेरूळ येथे लहान मुलांसाठी पहिली शाळा सुरू करण्याचा उपक्रम राबविणाऱ्या रजनी कडोसे आणि सामाजिक कार्यकर्ते सलमान इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी अनाथ मुलांसाठी आश्रम उभारण्याच्या संकल्पाचे स्वागत करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप भोगे यांनी आभार मानले. श्रीकांत गुरव यांच्या समारोपाच्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली.

आरोग्य, व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून अनाथ मुलांना सुरक्षित भविष्य देण्याबरोबरच समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा संदेश देण्यात आला.