वसमतचे हरिद्रा संशोधन केंद्र राज्यातील हळद उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणार
हिंगोली, दि. २ नोव्हेंबर : वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र राज्यातील हळद उद्योगाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल. हळद उत्पादन, संशोधन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
आरोग्य संवाद यात्रा २०२६ अंतर्गत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन केंद्राच्या कार्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी केंद्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, हळद प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या विविध संधींची माहिती जाणून घेत केंद्राच्या उपक्रमांचे कौतुक केले.
हळद हे मराठवाड्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून हिंगोली जिल्ह्यात या पिकाला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित लागवड पद्धती, दर्जेदार बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन आणि रोग-कीड नियंत्रण याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन आवश्यक आहे. या दृष्टीने संशोधन व प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे आबिटकर यांनी सांगितले.
हळदीवर प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास शेतमालाला अधिक बाजारमूल्य मिळू शकते. स्वच्छता, उकळणे, वाळविणे, दळणे, प्रतवारी आणि पॅकिंग अशा आधुनिक प्रक्रियांना प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध होतील. तसेच प्रक्रिया उद्योगांमुळे स्थानिक युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी मिळतील, असे केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
कृषी उत्पादनाला प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल. शेतकरी, कृषी तज्ज्ञ, संशोधक आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधून हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादनाला व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या भेटीप्रसंगी केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, केंद्राचे संचालक लक्ष्मीनारायण मूरक्या, सदाशिव पुंड, रितेश जुजाराव, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, संचालक आरोग्य सेवा पुणे डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन वानरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार हेमंत पाटील यांनी केंद्राच्या कार्याची सविस्तर माहिती दिली, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी सादरीकरणाद्वारे केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.