महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना मिळाले विक्रीचे व्यासपीठ

महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना मिळाले विक्रीचे व्यासपीठ
महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना मिळाले विक्रीचे व्यासपीठ
महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना मिळाले विक्रीचे व्यासपीठ

पनवेल, दि. ३१ ऑक्टोबर : महिला उद्योजिका आणि बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देत आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्याच्या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे उद्योजिका दिवाळी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्याला आणि कष्टाला व्यासपीठ मिळत असून त्यांना व्यवसायवृद्धीची संधी उपलब्ध होत आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे, समितीच्या सदस्या, नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महिला उद्योजिका आणि बचत गटांनी तयार केलेल्या स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन महिला उद्योजिकांकडून खरेदी करावी आणि त्यांच्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले.

महोत्सवात दिवाळी फराळ, हस्तकलेच्या वस्तू, दागिने, सजावटीचे साहित्य, साड्या, ड्रेस, आयुर्वेदिक उत्पादने तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना दिवाळीच्या खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

लहान मुलांसाठी छोट्यांची मोठी दुनिया या संकल्पनेतून विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिरते तारांगण, छोटे इंजिनिअर्स, मिनी कार रेसिंग आणि छोटे शेफ अशा उपक्रमांचा समावेश आहे. खेळातून शिक्षण देणाऱ्या या उपक्रमांमुळे मुलांची जिज्ञासा, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत होणार आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला सक्षमीकरणाच्या विचारातून प्रेरणा घेऊन महिला उद्योजिका व बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी महिलांकडून खरेदी करून त्यांच्या मेहनतीला साथ द्यावी आणि त्यांच्या दिवाळीत आनंद निर्माण करावा.

हा महोत्सव ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नूतन गुजराती शाळेच्या मैदानावर, पटवर्धन हॉस्पिटलसमोर, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून दिवाळी खरेदीबरोबरच बालमहोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.