३१० कातकरी लाभार्थ्यांना जातीचे दाखले आणि रेशनकार्ड

३१० कातकरी लाभार्थ्यांना जातीचे दाखले आणि रेशनकार्ड
३१० कातकरी लाभार्थ्यांना जातीचे दाखले आणि रेशनकार्ड

पुणे, दि. २६ : खेड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे कातकरी समाजातील ३१० लाभार्थ्यांना जातीचे दाखले आणि रेशनकार्डचे वितरण करण्यात आले. हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा उपक्रम राबविण्यात आला.

जनजाती कल्याण आश्रम, सेवा सहयोग फाउंडेशन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव, तहसील कार्यालय खेड आणि पंचायत समिती खेड यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जातीचे दाखले आणि रेशनकार्ड उपलब्ध झाल्यामुळे कातकरी समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळण्यास मदत होणार आहे.

यावेळी नाशिक जनजाती कल्याण आश्रमाचे सचिव शरद शेळके, प्रकल्प अधिकारी प्रियंका घनवट, वरिष्ठ आदिवासी निरीक्षक शरद काळे आणि जनजाती कल्याण आश्रमाचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ चौरे उपस्थित होते.

शरद शेळके यांनी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदानाचा आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा उल्लेख केला. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा वाघ यांनी केले. घोडेगाव आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल रेणुका जाधव यांनी आभार मानले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, जनजाती कल्याण आश्रमाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.