ताकतोड्यात डेंग्यू मलेरिया प्रतिबंधासाठी पाहणी
हिंगोली, दि. ३ : प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या ताकतोडा येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी भेट देऊन गावातील आरोग्य परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान काही ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्याने आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या.
पाणीसाठ्यांमध्ये अबेटिंग करण्यात आले. तसेच अळ्या आढळलेल्या भांड्यांमधील पाणी रिकामे करून भांडी स्वच्छ व कोरडी करण्यात आली. डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना डॉ. पुरी यांनी ग्रामपंचायतीला दिल्या.
गटारे नियमित स्वच्छ करणे, परिसरात पाणी साचू न देणे आणि डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस संपूर्ण गावात कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले. या दिवशी घरातील सर्व पाणीसाठे रिकामे करून भांडी स्वच्छ व कोरडी ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियमित गृहभेटी घेऊन गावातील नागरिकांचे सर्वेक्षण करावे. ताप किंवा इतर आजारांची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची तातडीने तपासणी करून वेळेत उपचार करावेत, अशा सूचनाही डॉ. पुरी यांनी दिल्या.
या पाहणीवेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामहरी बेले, जिल्हा माध्यम अधिकारी मारोतराव पोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. तपासे, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी संजय पवार, आरोग्य सहायक रामदेव जोशी, संजय बोरबले, ग्रामपंचायत अधिकारी श्री. मेनकुंदळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. महादेव वानखेडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगावचे आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.