मनोरा आमदार निवासाची नूतन वास्तू फेब्रुवारी २०२८ पूर्वी सेवेत

मनोरा आमदार निवासाची नूतन वास्तू फेब्रुवारी २०२८ पूर्वी सेवेत
मनोरा आमदार निवासाची नूतन वास्तू फेब्रुवारी २०२८ पूर्वी सेवेत
मनोरा आमदार निवासाची नूतन वास्तू फेब्रुवारी २०२८ पूर्वी सेवेत

मुंबई | विशेष प्रतिनिधी सौ. रूपाली मनोज बैसाने

मुंबईतील महाराष्ट्र विधानमंडळाजवळ उभारण्यात येत असलेल्या नूतन मनोरा आमदार निवासाचे बांधकाम वेगाने सुरू असून, फेब्रुवारी २०२८ पूर्वी ही वास्तू आमदारांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पातील अ आणि ब हे दोन्ही मनोरे सर्व आवश्यक सोयीसुविधांसह पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ९ ऑक्टोबर रोजी प्रकल्पस्थळी भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

प्रकल्पातील अ मनोऱ्याचे सर्व २९ मजले पूर्ण झाले आहेत, तर ब मनोऱ्याचे ४२ पैकी ३४ मजले पूर्ण झाले आहेत. उर्वरित काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने बांधकामाला गती देण्यात येत आहे.

नूतन वास्तूची उपयुक्तता आणि सौंदर्य यांचा समतोल राखून तिचे वैशिष्ट्य जपावे, अशा सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वास्तूचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करावी आणि यापूर्वी दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

नव्या मनोरा आमदार निवासात आमदार, त्यांचे स्वीय सहायक, अभ्यागत आणि कार्यालयीन कामकाजासाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय उपाहारगृहे, वाहनतळ, बैठक कक्ष आणि इतर आवश्यक सुविधांचा समावेश असणार आहे.

या पाहणीवेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वास्तुविशारद आणि प्रकल्पाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.