मुलींनी गाजवली पंडितराव वक्तृत्व स्पर्धा

मुलींनी गाजवली पंडितराव वक्तृत्व स्पर्धा

ठाणे कै. नी. गो. पंडितराव स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या ५८ व्या वर्षी मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत बारापैकी दहा पारितोषिके पटकावली. पदवी गटात पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयाची रिद्धीमा बापट, तर कनिष्ठ महाविद्यालय गटात ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाची निलाक्षी जानवे हिने प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

श्री समर्थ सेवक मंडळ, ठाणे यांच्यातर्फे दरवर्षी ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या पदवी गटात रिद्धीमा बापट हिने प्रथम क्रमांक मिळविला. मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयातील अनुष्का गांगल हिने द्वितीय, तर पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधील शिवम जाधव याने तृतीय क्रमांक पटकाविला. सर परशुराम महाविद्यालयाच्या श्रावणी राजगुरू हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मीरा पोंक्षे हिला नियोजित भाषणाचे विशेष पारितोषिक मिळाले. उत्स्फूर्त भाषणाचे विशेष पारितोषिक रायगडच्या डी. जी. तटकरे महाविद्यालयातील पंकज पांडुळे याला मिळाले.

कनिष्ठ महाविद्यालय गटात निलाक्षी जानवे हिने प्रथम, तर तिच्याच महाविद्यालयातील अनुश्री मोहिते हिने द्वितीय क्रमांक मिळविला. रत्नागिरीच्या पी. जी. अभ्यंकर महाविद्यालयातील राधा पाटणकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ठाण्यातील एम. एच. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या शुभ्रा धानके हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. नियोजित भाषणाचे विशेष पारितोषिक पी. जी. अभ्यंकर महाविद्यालयाच्या सई रानडे हिला, तर उत्स्फूर्त भाषणाचे विशेष पारितोषिक याच महाविद्यालयाच्या दुहिता घोलकर हिला मिळाले.

अध्यक्षीय भाषणात अभय ओक यांनी चांगला वक्ता होण्यासाठी मनात तळमळ असणे आवश्यक असल्याचे सांगितले. कृत्रिम प्रज्ञेच्या सध्याच्या युगात तिचे सहाय्य घ्यावे, मात्र स्वतःचे विचार विकसित करून विषयाची मांडणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण संवर्धन हे पुढील पिढीसमोरील मोठे आव्हान असून पृथ्वीचे आपण मालक नसल्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेचे परीक्षण मयुरेश गद्रे, प्रा. डॉ. विमुक्ता राजे, प्रा. डॉ. अमेय बाळ आणि प्रा. डॉ. प्रतिक्षा बोर्डे यांनी केले. स्पर्धा समितीचे अध्यक्ष डॉ. चैतन्य साठे यांनी प्रास्ताविक केले. पारितोषिकांची घोषणा पौर्णिमा जोशी यांनी केली, तर योगेश भालेराव यांनी आभार मानले. रवींद्र मांजरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि श्रीगोंदा येथून स्पर्धक सहभागी झाले होते. हनुमान व्यायामशाळेच्या शिवदौलत सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला स्पर्धक, मंडळाचे सदस्य, पंडितराव कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते.