लंडनमध्ये होणार विश्व मराठी साहित्य संमेलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
लंडन, दि. ११ : जगभरातील मराठी बांधव, उद्योजक आणि मराठी संस्कृतीला एका व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लंडन येथील ऐतिहासिक महाराष्ट्र मंडळाच्या वतीने शिंदे यांना ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र भवनात झालेल्या कार्यक्रमात मराठी बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. जय महाराष्ट्र आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लंडनस्थित मराठी जनतेला आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
जागतिक मराठी समाजासाठी मध्यवर्ती संस्था
सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली माती, भाषा आणि संस्कृती विसरत नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन भरवण्यात येईल. तसेच जगभरातील मराठी भाषकांना जोडण्यासाठी मध्यवर्ती संस्था स्थापन करण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी संस्कृतीचे जतन करा
मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना शिंदे यांनी महाराष्ट्र मंडळाने लंडनमध्ये मराठी परंपरा जपण्याचे कार्य पुढेही सुरू ठेवावे, असे आवाहन केले. सरकार आणि आपण मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विकासाला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न
महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले असून मुंबई आणि एमएमआरच्या विकासातून राज्याची आर्थिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार विकासाच्या ब्रेकवर नसून ॲक्सिलेटरवर असल्याचे सांगत शिंदे यांनी राज्याच्या विकासाचा वेग वाढवण्यावर भर दिला. गणेशोत्सव आणि दहीहंडी यांसारखे सण उत्साहाने साजरे करण्यासाठी सरकारने गतिरोधक दूर केल्याचेही त्यांनी नमूद केले.
पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्राची प्रगती
अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे मिसिंग लिंक टनेल आणि वाढवण बंदर यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन बनत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेत मोबदला देण्यात आला. सरकार आणि जनतेमधील विश्वासामुळे जमीन संपादनाची प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण होण्यास मदत झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.
लंडनशी महाराष्ट्राचे ऐतिहासिक नाते
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा लंडनशी संबंध असल्याचे सांगून शिंदे यांनी बाबासाहेबांच्या लंडनमधील वास्तव्याच्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने स्मारक विकसित केल्याचे नमूद केले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला राज्याच्या सर्वोच्च पदावर सेवा करण्याची संधी मिळाली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. गोविंद कानेगावकर, अध्यक्ष वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, अभिनेते आणि चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.