रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग यांचे निधन

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग यांचे निधन

मुंबई, दि. २९ ऑक्टोबर : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे प्रभारी सुरेश बारसिंग यांचे चेंबूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ता आणि जवळचा सहकारी गमावल्याची भावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. त्यांनी बारसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

सुरेश बारसिंग यांनी दलित पँथर चळवळीपासून रामदास आठवले यांना साथ दिली होती. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते आठवले यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय होते. सांगली जिल्ह्यातील माहुली गावचे मूळ रहिवासी असलेल्या बारसिंग यांनी मुंबईतील वडाळा येथील सिद्धार्थ हॉस्टेलमधून दलित पँथर चळवळीत सहभाग घेतला. बँकेत नोकरी करत असतानाही त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य अखंडपणे सुरू ठेवले.

दलित पँथर, भारतीय दलित पँथर आणि रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्यांनी संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासह राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. भारतीय दलित पँथरचे संरक्षक प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. आपल्या मजबूत देहयष्टीमुळे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये दलित पँथरचा दारासिंग म्हणून परिचित होते.

सुरेश बारसिंग यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित केले. त्यांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चार दशकांहून अधिक काळ मोलाची साथ दिली. त्यांच्या निधनाने वैयक्तिक हानी झाली असून रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या स्मृती सदैव हृदयात जिवंत राहतील, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुरेश बारसिंग यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दादर येथील चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.