पनवेल महापालिकेत दक्षता जनजागृती सप्ताह
पनवेल, दि. २९ ऑक्टोबर : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार प्रतिबंध, पारदर्शक प्रशासकीय कारभार आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ठाणे परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे युनिट प्रमुख धर्मराज सोनके उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांनी समृद्ध भारताच्या निर्मितीमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहणे, शासकीय कामकाजात पारदर्शकता राखणे आणि नागरिकांना प्रामाणिकपणे सेवा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी केले. तर उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त मंगला माळवे, उपायुक्त अभिषेक पराडकर, सहायक आयुक्त बाळाराम रातांबे आणि सहायक आयुक्त डॉ. रुपाली माने यांच्यासह महापालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला महापालिकेच्या सुमारे सहाशे कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासह जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.